नाशिक : मुळेगावापासून अंजनेरीच्या माथ्यापर्यंत १४ कि.मी लांबीचा रस्ता वनक्षेत्रातून करण्याचा घाट घातला गेला होता. रस्त्याच्या प्रस्तावाला शहरातील पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेत कडाडून विरोध करत 'अंजनेरी वाचवा' ही चळवळ हाती घेतली. यानंतर पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि.७) "महाविकास आघाडी सरकार हे शाश्वत विकासासाठी वचनबध्द आहे. फार पुर्वीपासून विचाराधीन असलेला हा प्रस्तावित रस्ता यापुढेही होणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरीचे पावित्र्य व जैवविविधता अबाधित रहावी हाच आमचा मानस आहे" असे दुपारी ट्विट केले. यामुळे निसर्गप्रेमींना मोठा दिलासा मिळाला.
१७ ऑक्टोबर रोजी 'लोकमत'ने याबाबत सर्वप्रथम वाचा फोडली. अंजनेरी वनातून होणारा संभाव्य रस्ता येथील निसर्गवैभवाला धोका निर्माण करणारा असल्याचे जनतेपुढे मांडले. सलग चार दिवस अंजनेरीच्या समृध्द र्जैवविविधतेवर मालिकेतून प्रकाश टाकला. यानंतर पर्यावरणप्रेमींसह विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत 'अंजनेरी वाचवा' असे अभियान हाती घेतले गेले. प्रारंभी सोशलमिडियाच्या माध्यमातून या विषयाबद्दल जनजागृती पर्यावरणप्रेमींकडून केली गेली. त्यानंतर गुरुवारी (दि.४) वनविभागाच्या कार्यालयत 'शिट्टी वाजवा, अंजनेरी वाचवा' असे अनोखे आंदोलन केले गेले. त्यानंतर तत्काळ दोन दिवसांत ठाकरे यांनी ट्विट केल्यामुळे पर्यावरणप्रेमी, साहसी पर्यटन करणो ट्रेकिंग संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.