आजी-माजी नगरसेवक समोरासमोर ठाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:42+5:302021-09-18T04:16:42+5:30
पंचवटी : सुरूवातीला शेकाप, शिवसेना, अपक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, तर कधी काँग्रेस, मनसेच्या बाजूने कौल देणाऱ्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये ...

आजी-माजी नगरसेवक समोरासमोर ठाकणार
पंचवटी : सुरूवातीला शेकाप, शिवसेना, अपक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, तर कधी काँग्रेस, मनसेच्या बाजूने कौल देणाऱ्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये यंदा सर्वच पक्षांनी शड्डू ठोकले असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी व मनसे पक्षात लढत होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या पालिका निवडणुकीत आजी-माजी नगरसेवक पुन्हा समोरासमोर उभे ठाकणार असल्याने सध्यातरी ही लढत सर्वच पक्षांसाठी विशेषतः गावकीसाठी प्रतिष्ठेची ठरणारी अशी आहे.
मनपाच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत शेकापच्या माध्यमातून गड राखणाऱ्या माजी नगरसेवक ॲड. जे. टी. शिंदे यांनी गेल्या निवडणुकीत शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातावर बांधले तर सलग दोन महापालिका निवडणुकीत प्रस्थान बसविणारे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक उद्धव निमसे यांनीदेखील गत निवडणूक भाजपकडून लढवली होती. प्रभागात भाजपचे वर्चस्व असून, चार सदस्यीय रचनेत उद्धव निमसे, सुरेश खेताडे, शीतल माळोदे व पूनम सोनवणे निवडून आले होते. यातील खेताडे हे मूळचे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत.
आडगाव भागात विद्यमान आमदार ॲड. राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप या दोहोंचे समर्थक असून, निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून नव्या इच्छुकांनी दावा केला आहे. आडगावात काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत एकदाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी गेल्यावेळी चांगली लढत दिली होती. यंदा तर ते जिल्हाध्यक्ष असल्याने रिंगणात उतरल्यास निवडणूक प्रतिष्ठेची हाेईल.
आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत शिवसेना हा मुख्य विरोधक राहिला असून, जे. टी. शिंदे पुन्हा शेकापत स्वगृही परतल्याने आगामी निवडणुकीत भाजपला सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापसारख्या इतर पक्षांशी लढत द्यावी लागणार आहे. आडगाव, नांदूर, कोणार्क नगर, जत्रा हॉटेल, निलगिरी बाग, हनुमान नगर भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात भाजपचे वर्चस्व असले तरी मळे परिसर प्रभावमुक्त आहे. तूर्तास प्रभाग रचना हीच राहते की बदलते, यावर बरीच राजकीय समिकरणे अवलंबून आहेत.
कोट...
नवीन कामे नाहीत
प्रभागात पाच वर्षांत कोणत्याही प्रकारची नवीन ठोस लक्षवेधी कामे झालेली नाहीत.
मळे परिसरातील रस्ते जैसे थे आहेत. अमृतधाम, दुर्गा नगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. काही ठराविक भागांत कामे झाली आहेत. नवीन वसाहतीत रस्ते, पाणीप्रश्न प्रलंबित आहेत.
- अनंता सूर्यवंशी, माजी नगरसेवक
इन्फो बॉक्स
संभाव्य उमेदवार
भाजप - उद्धव निमसे, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, राम संधान, गणेश माळोदे, मंगला शिंदे.
शिवसेना - मल्हारी मते, संदीप लभडे, सुनील जाधव, विश्वास तांबे, पोपट शिंदे, सुरेश मते, सिद्धेश अंडे.
राष्ट्रवादी काँग्रेस - सुनीता निमसे, प्रभाकर माळोदे, कैलास शिंदे, अतुल मते.
मनसे - अनंता सूर्यवंशी, भाऊसाहेब निमसे.
काँग्रेस - राजकुमार जेफ.
शेकाप - ॲड. जे. टी. शिंदे.
इतर - बालाजी माळोदे, मयुरा गांगुर्डे.