ग्रामपंचायतच्या कामांमध्ये गैरव्यवहार
By Admin | Updated: May 6, 2017 22:24 IST2017-05-06T22:24:32+5:302017-05-06T22:24:46+5:30
कळवण : तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे

ग्रामपंचायतच्या कामांमध्ये गैरव्यवहार
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार झाला असून, या कामांची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थ मकरंद वाघ यांनी केली आहे. भाजपाचे प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पिळकोस ग्रामपंचायत अंतर्गत कामाची व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची चौकशीची मागणी केली आहे. या मागणीनुसार जिल्हा परिषदेने कळवण पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पिळकोस येथील वाघ यांनी पिळकोस गावात विविध योजनांमध्ये व शासनस्तरावरून आलेल्या निधीतून केलेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाली असल्याने गैरप्रकार होऊन भ्रष्टाचार झाला असल्याने याबाबत माहिती मिळावी, अशी मागणी माहितीच्या अधिकारात पिळकोस ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून माहिती दडवून ठेवल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांच्याकडे प्रथम अपील दाखल करून वाघ यांनी माहिती मागितली. कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांच्याकडे प्रथम अपिलाची सुनावणी होऊन ग्रामसेवक यांना आठ दिवसांत माहिती देण्याबाबत सूचना व आदेश देऊनदेखील ग्रामसेवक यांनी कुठलीही माहिती दिली नाही. त्यामुळे वाघ यांनी कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्याने शासन निर्णयानुसार अपिलीय अधिकारी सोनवणे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे व माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मकरंद वाघ यांनी गटविकास अधिकारी सोनवणे यांच्याकडे केली आहे.
पिळकोस गावातील खटोणे मळा या भागातील अंगणवाडीतील मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधकामासाठी तरतूद केलेल्या रकमेत पाण्याच्या टाकीचे आरसीसी बांधकाम न करता प्लॅस्टिकची टाकी बसवली आहे. आजूबाजूला वीटकाम करून आरसीसी बांधकाम केल्याचे भासवून ग्रामस्थांची धूळफेक केली आहे व त्यात गैरव्यवहार घडला असल्याचा संशय वाघ यांनी व्यक्त आहे.
पिण्याच्या पाण्याची टाकी असुरक्षित असून पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने पाण्यात जीवजंतू निर्माण होऊन अंगणवाडीतील लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. गावातील दलित वस्ती अंतर्गत सिमेंट काँक्र ीटीकरण रस्ता मंजूर करण्यात आला होता. सिमेंट कॉँक्रीटीकरण रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हित न साधता ठेकेदाराचे हित जोपासले असून, आज रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्ते विकास कामात गैरव्यवहार झाला असल्याने याची चौकशी करून ठेकेदार व ग्रामसेवक यांच्यावर ग्रामस्थांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
पिळकोस गावातील गटार योजना काम व स्मशानभूमी काम करताना ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता शासन नियम धाब्यावर बसवून गटार व स्मशानभूमीची कामे केली जात असून, निकृष्ट दर्जाची कामे करण्याचा सपाटा लावला आहे. शासनस्तरावरून येणाऱ्या शासकीय योजना व निधी याची माहिती ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना ग्रामसेवक यांच्याकडून दिली जात नसून कुठलीही ग्रामसभा घेतली जात नाही.
रस्त्यावर सह्या घेऊन ग्रामसभा झाल्याचे दाखवून मनाप्रमाणे ठराव तयार करून ग्रामसभेत ठराव मंजूर केल्याचे शासनस्तरावर व शासकीय यंत्रणेला भासवून कागदोपत्री कारभार करून पिळकोस ग्रामस्थांची धूळफेक व शासनाची फसवणूक ग्रामसेवक करीत असून, कळवण पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याची तक्रार पिळकोस येथील मकरंद वाघ यांनी केली आहे. या तक्रारीवरून भाजपा प्रदेश व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदन देऊन पिळकोस ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.