Governor refuses Tripurari chariot procession | त्रिपुरारीच्या रथ मिरवणुकीस प्रांताधिकाऱ्यांचा नकार

त्रिपुरारीच्या रथ मिरवणुकीस प्रांताधिकाऱ्यांचा नकार

त्र्यंबकेश्वर : नगरीची अस्मिता, वैभव असणार्‍या भगवान त्र्यंबकेश्वराच्या त्रिपुरारी पोणिर्मोनमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला प्रांताधिकाऱ्यांनी एेनवेळी परवानगी नाकारल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली तयारी पाण्यात गेली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रथोत्सवाची तयारी पंधरा दिवसां पासुन सुरु होती. दिवाळी पासुन ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकराजाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथाला रंगरंगोटी करुन रथ रस्त्यावर आणण्यात आला. नगर पालीकेने रथ मार्गावरील खड्डे बुजवले. प्रशासनाने रथ मार्गाची पाहणी केली, पोलीसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. भाविक व ग्रामस्थांसाठी काही निर्बंध लावण्यात आले. रथ मार्गावरील दुकाने रविवारी दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे लेखी आदेश नगर पालिकेने प्रत्येक दुकानदारांना दिले. एवढं सगळं करुन रथोत्सव संपन्न होणार म्हणुन नगरवासीय आनंदात होते. मात्र ऐनवेळी प्रांताधिकार्‍यांनी रथोत्सवाला परवानगी देता येणार नसल्याचे पत्र देऊन नागरीकांचा हिरमोड केला. त्यामुळे परवानगी द्यायची नव्हती तर तयारी तरी कशाला करायला लावली? अशी भावना व्यक्त होत आहे. 
प्रांताधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकारी देवस्थान विश्वस्त यांनी संयुक्त रित्या रथ मार्गाची पाहणी करुन रस्त्याबाबत आवश्यक त्या रस्ता दुरुस्तीच्या सुचना दिल्या. रात्री उशीरा देवस्थानला रथ मिरवणुकीसाठी परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. सर्व तयारी देवस्थान ट्रस्टने प्रशासना समोर केली असतांना ऐनवेळी प्रशासनाला परवानगी नाकारण्याचा कसा काय साक्षात्कार झाला याबाबत गावात चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक रथाला हजारो रुपयांची रंगरंगोटी केली. रथासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

Web Title: Governor refuses Tripurari chariot procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.