.डाव्या आघाडीकडून सरकारचा निषेध
By Admin | Updated: July 21, 2015 00:31 IST2015-07-21T00:30:57+5:302015-07-21T00:31:18+5:30
.डाव्या आघाडीकडून सरकारचा निषेध

.डाव्या आघाडीकडून सरकारचा निषेध
नाशिक : केंद्रातील नरेंद्र व राज्यातील देवेंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात डावी व लोकशाही आघाडीच्या वतीने सोमवारी सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी ‘न पैसा खाउंगा, न खाने दुंगा’ असे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकार भ्रष्टाचारात गुरफटले, आयपीएल घोटाळा, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे यांचे ललित मोदींशी असलेले संबंध, तर स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा वाद सुरू आहे. महाराष्ट्रात विनोद तावडे यांची डिग्री घोटाळा, पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, मध्य प्रदेशात व्यापमं घोटाळा या साऱ्या गोष्टी पाहता केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचारी असल्याचे स्पष्ट झाले असून, या घोटाळ्यांची कसून चौकशी करावी तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी व जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत घोटाळेबाजांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. दुपारी दोन वाजता जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात राजू देसले, श्रीधर देशपांडे, साधना गायकवाड, राजू नाईक, सीताराम ठोंबरे, हेमंत वाघेरे, अॅड. राजपाल शिंदे, जे. टी. शिंदे, मनीष बस्ते, पी. बी. गायधनी, मंगला गोसावी, संगीता उदमले, केरू पाटील हगवणे, प्रमोद पाटील यांच्यासह भाकप, माकप, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, भारिप बहुजन महासंघाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)