शासकीय रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला
By Admin | Updated: May 30, 2014 18:25 IST2014-05-29T23:32:48+5:302014-05-30T18:25:13+5:30
रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला

शासकीय रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला
रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला
कर्मचार्यांचा हलगर्जीपणा : घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाईची मागणी
गडचिरोली : सायंकाळी मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन केंद्राच्या फ्रिजरमध्ये न ठेवता रूग्णालय कर्मचार्यांनी सामानाच्या खोलीमध्ये ठेवला. त्यामुळे उंदरांनी मृतदेह कुरतडला. रूग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविषयी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे़
चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील मारोडा येथील रंगूबाई पांडूरंग पेदापल्लीवार (६५) या महिलेला बुधवारी दुपारी किटकाने चावा घेतल्याने मूल येथे हलविण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला गडचिरोलीच्या रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथे आणण्यात आले. मात्र, अवघ्या एका तासातच तिचा मृत्यू झाला. सदर मृतदेहाचा पंचनामा गुरूवारी सकाळी करायचा असल्याने रूग्णालय प्रशासनाने तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह रात्रभर रूग्णालय प्रशासनाच्या ताब्यात राहत असेल तर तो मृतदेह रूग्णालय परिसरात असलेल्या शवविच्छेदन केंद्रात ठेवणे आवश्यक होते. शवविच्छेदन केंद्रात सध्या स्थितीत चार फ्रिजर आहेत.
मात्र, रूग्णालय कर्मचार्यांनी रंगूबाईचा मृतदेह शवविच्छेदन केंद्रात न नेता तो रूग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या २५ क्रमांकाच्या खोलीमध्ये ठेवला. रात्रभर खोलीतील उदरांनी रंगूबाईच्या मृतदेहाचे लचके तोडले. शवविच्छेदन केंद्राकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. रंगूबाईचा चेहरा पाहून नातेवाईकांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. काही नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विचऑफ होता व ते चामोर्शी येथे दौर्यावर असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)