महापालिकेतील ५६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर गुडबाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:29+5:302021-02-05T05:41:29+5:30
नाशिक- कोराेनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात कंत्राटी स्वरूपात भरती केलेले वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी अशा ५६९ जणांना अखेरीस ...

महापालिकेतील ५६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर गुडबाय
नाशिक- कोराेनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात कंत्राटी स्वरूपात भरती केलेले वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी अशा ५६९ जणांना अखेरीस महापालिकेने १ फेब्रुवारीपासून सेवामुक्त केले आहे. कोरोनाची स्थिती आटाेक्यात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपताच त्यांचे काम थांबवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात केारोनाचे संकट उद्भवल्यानंतर महापालिकेचीच नव्हे तर सर्वच शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कोरोनाशी कसा मुकाबला करावा, असा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने कंत्राटी स्वरूपात तातडीने वैद्यकीय अधिकारी तसेच नर्स, वॉर्ड बॉय आणि अन्य कर्मचारी भरण्यास परवानगी दिली. शासनाच्या पोर्टलवरूनदेखील जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतदेखील कर्मचारी उपलब्ध झाले. त्यामुळे नाशिक महापालिकेची तात्पुरत्या स्वरूपात कुमक उपलब्ध झाली. या कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांनी मुदतवाढ देण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना संसर्ग कमी होऊ लागला असला तरी हिवाळ्यात काेरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहित धरून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिने अखेरच्या टप्प्यातील मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत अखेरीस ३१ जानेवारीस संपुष्टात आल्याने या आरोग्य कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला.
नाशिक महापालिकेत कायम डॉक्टर ४७ असून, आरोग्य अभियान आणि मानधनावरील डॉक्टरांची संख्या लक्षात घेतली तर सध्या आणखी ३० ते ३५ डॉक्टर्स उपलब्ध आहेत; मात्र त्यापलिकडे अन्य डॉक्टरांनादेखील निरोप देण्यात आला आहे. डॉक्टरांची गरज असली तरी त्याबाबत प्रशासन स्वतंत्र निर्णय घेऊन पुन्हा डॉक्टरांची भरती करेल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
इन्फो..
जानेवारी महिन्याचे वेतन राहिले
ज्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने निरोप दिला त्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन मात्र अदा व्हायचे बाकी असून, येत्या काही दिवसात त्यांना ते दिले जाणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.