आषाढातही शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:46+5:302021-07-22T04:10:46+5:30
सामान्यत: आषाढात कधीही मुहूर्त होत नाहीत. त्यामुळे आषाढाच्या आधी थांबलेले विवाह दिवाळीनंतरच होत असतात. आषाढात सामान्य शुभ कार्य केले ...

आषाढातही शुभमंगल सावधान
सामान्यत: आषाढात कधीही मुहूर्त होत नाहीत. त्यामुळे आषाढाच्या आधी थांबलेले विवाह दिवाळीनंतरच होत असतात. आषाढात सामान्य शुभ कार्य केले जात नाही. त्याचे कारण म्हणजे या काळापासून देव शयनी असतात, असे मानले जाते. त्यामुळे या कालावधीत लग्नासारखे शुभ कार्य होत नसले तरी यंदा कोराेनामुळे स्थिती बदलू लागली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाट येणार नाही, असे वाटत असतानाच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे भाकीत खरे ठरले आणि हाहाकार माजला. आता तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती लक्षात घेता काळजी घेतली जात असून, दिवाळीची वाट न बघता आता आषाढातच विवाह होत आहेत. विशेष म्हणजे दाते पंचांगसारख्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या पंचागांतदेखील आपत्कालीन मुहूर्त देण्यात आल्याने त्याला शास्त्रीय आधारही प्राप्त झाला आहे.
कोट...
आपत्कालीन परिस्थिती म्हणून आषाढात विवाह मुहूर्त दिले जात असून, त्यामुळे यंदा या महिन्यातदेखील लग्न होत आहेत. आपत्काळात विवाह सोहळ्याचे मुहूर्त पंचांगात देण्यात आले असून, त्यानुसार यंदा प्रथमच विवाह सोहळे होत आहेत.
- अमित गायधनी, पुरोहित
कोट..
जीवन व्यवस्थेत बदल झाल्याने चातुर्मासात आणि गुरू किंवा अस्त काळात विवाह मुहूर्त देता येईल काय, याबाबत राज्यातील पंचांगकर्त्यांनी २०१९पासूनच आपत्कालीन मुहूर्त देणे सुरू केले. यजमान, मंगल कार्यालय आणि गुरूजी यांच्या सोयीचा त्यात विचार असून, हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे.
- रत्नाकर संत गुरूजी
इन्फो...
परवानगी पन्नासची पण...
कोरोना संकटामुळे राज्य शासनाने विवाह सोहळ्यांसाठी असलेले निर्बंध शिथिल केलेले नाहीत. त्यामुळे सध्या पन्नास जणांनाच विवाह सोहळ्याला परवानगी आहे. अर्थात आता अनेक ठिकाणी गर्दीचे नियम पाळले जात असून, अनेक ठिकाणी वऱ्हाडी येऊन जाऊन असल्याने पन्नासपेक्षा अधिक वऱ्हाडी येतात. ग्रामीण भागात त्यापेक्षा अधिक गर्दी असते.
इन्फो...
मंगल कार्यालये बुक
- नाशिक शहरातील बहुतांश मंगल कार्यालये विवाह सोहळ्यामुळे बुक होत असून, कोरोना काळात व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
- कोरोनामुळे निर्बंधांचे पालन करतानाच सर्व शासकीय यंत्रणांच्या परवानग्या घेऊनच लग्न सोहळे होत आहेत.
- केवळ मंगल कार्यालयेच नव्हे; तर हॉटेल्स चालकांनादेखील या निर्णयामुळे सुगीचे दिवस आले असून, तेथे तसेच शहराबाहेरील फार्म हाऊसमध्येही बार उडत आहेत.