गोणी लिलावाला विरोध : उमराणेत रास्ता रोको; पिंपळगाव येथे लिलाव पाडले बंद

By Admin | Updated: July 26, 2016 21:49 IST2016-07-26T21:49:39+5:302016-07-26T21:49:39+5:30

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Goni Lilawala opposes: stop the journey of Umraonat; Auctioned pimp off at Pimpalgaon | गोणी लिलावाला विरोध : उमराणेत रास्ता रोको; पिंपळगाव येथे लिलाव पाडले बंद

गोणी लिलावाला विरोध : उमराणेत रास्ता रोको; पिंपळगाव येथे लिलाव पाडले बंद

कळवण/उमराणे/पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडू लागला असून, दुसरीकडे शासन धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केल्याने बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला असून, कांदा लागला सडू आणि शेतकरी लागला रडू अशी स्थिती सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासन धोरण आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, कांदा गोणी लिलाव पद्धतीच्या निषेधार्थ उमराणे येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, तर पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. कळवण येथे उद्या, बुधवारी (दि. २७) सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, गुरुवारी (दि. २८) कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बाजार समित्या १५ दिवसांपासून बंद असल्याने बाजार समितीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याचे बाजारभाव कधी वाढतील याची शाश्वती नसल्याने चाळीतील कांदा खराब होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी कांदा व्यापाऱ्यांची मनधरणी करून कांदा विक्रीसाठी व चांगल्या बाजारभावासाठी व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवित असून, गरज समजून मात्र शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.
शासनाच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केले असल्याने बाजार समित्या बंद आहेत. समितीच्या आवारात गेल्या ११ जुलैपासून कांदा लिलाव बंद असल्याने कळवण तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांकडून शिवार खरेदी सुरू करण्यात आली आहे. बाजारभाव नसल्याने भांडवल वसूल होईल या आशेने शेतकरी कांदा विक्री करत आहेत.
कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. बाजारभाव नसल्याने शेतकरी बांधवांनी कांद्याची चाळीत साठवणूक केली असून, कांदा सडण्यास सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊस, हवामानातील बदल या सर्वांचा फटका तालुक्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे. दरवर्षी उत्तमरीत्या टिकणाऱ्या कांद्याचे उत्पादन कळवण व लगतच्या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्या वर्षी बियाणात मोठ्या प्रमाणात फसवणूक व त्यामुळे डोंगळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ तसेच अवकाळी पावसाचा फटका, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यात कांदा उत्पादनात मोठी घट झाली होती. मात्र यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून कांदा चाळी बांधल्या. बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदे चाळीत साठवले. परंतु दिवाळीपर्यंत टिकणारा कांदा सध्या मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. (लोकमत ब्युरो)

Web Title: Goni Lilawala opposes: stop the journey of Umraonat; Auctioned pimp off at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.