गोंदे फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:32 IST2019-08-22T23:22:03+5:302019-08-23T00:32:10+5:30
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील समांतर रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

गोंदे फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गाची चाळण
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील समांतर रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत असून, रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम नाठे आदींसह ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्रमुख अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथील वाहनधारक धास्तावले आहेत. सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गावरील औद्योगिक वसाहतीत असल्यामुळे या परिसरात रात्री-अपरात्री कामगारांची नेहमीच वर्दळ असते. यामुळेच या रस्त्याला पथदीप नसल्यामुळे अपघाताचा सामना करावा लागतो. रस्त्याची दुरुस्ती करण्यात येऊन या रस्त्याला पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी सरपंच शरद सोनवणे केली आहे.
नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा नाशिकहून मुंबईकडे जातो, त्यामुळे दररोज येथून हजारो वाहनांची मालवाहतूक होत असते; मात्र पावसाळ्यात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.