गोल्फ क्लब मैदानाचे झाले हुतात्मा कान्हेरे मैदान
By Admin | Updated: February 5, 2017 23:03 IST2017-02-05T23:02:47+5:302017-02-05T23:03:05+5:30
गोल्फ क्लब मैदानाचे झाले हुतात्मा कान्हेरे मैदान

गोल्फ क्लब मैदानाचे झाले हुतात्मा कान्हेरे मैदान
इतिहास चाळताना
शिवसेनेचे पहिले महापौर असलेल्या वसंत गिते यांच्या काळात अनेक जुन्या कामांना मुहूर्त लागला. विशेषत: प्रशासकीय कालावधीपासून ज्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम याकाळात झाले. त्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची याच कालावधीत नाशिकमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी ‘गोल्फ क्लब कसले, हे तर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असे नाव दिले आणि महापालिकेने तसे नामकरण केले. सिडकोतील संभाजी राजे स्टेडियमचा निर्णय १९९७-९८ सालीच झाला. कोणत्याही महापौरपदाच्या कालावधीत चांगले निर्णय होतात, काही प्रस्ताव प्रशासकीय कार्यवाहीत असतात आणि नंतर ते संबंधित लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीत मांडले जातात. तसे अनेक निर्णय या कालावधीत झाले. गोल्फ क्लबचा जॉगिंग ट्रॅक असो किंवा अन्य अनेक चांगल्या कामांचे निर्णय झाले. मात्र, प्रत्येक महापौरांच्या कारकिर्दीत काही ना काही वादग्रस्तही निर्णय होतात. गिते यांच्या कारकिर्दीत आरक्षण वगळण्याचे काही वादग्रस्त ठराव झाले. त्याचे खापर कालांतराने गिते यांच्यावर फोडण्यात आले, परंतु गिते यांच्यावर आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या एका नगरसेवकानेच या ठरावांवर सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या केल्याचे महासभेत उघड झाले. त्यामुळे संबंधित नगरसेवकानेही महापौरांच्या लाल दिव्याच्या गाडीत फिरताना भुरळ पडली व मी सह्या केल्या, असे मान्य केले. त्यामुळे काही सभा गाजल्या. - संजय पाठक