नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळील वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर नाचविले; शिक्षिकेविरोधात पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2023 15:16 IST2023-06-20T15:12:31+5:302023-06-20T15:16:21+5:30
याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळील वसतिगृहातील मुलींना पर्यटकांसमोर नाचविले; शिक्षिकेविरोधात पोलिसांत गुन्हा
वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर: तालुक्यातील पहिने जवळील चिखलवाडी येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास भाग पडल्याचा आरोप करीत पालकांनी संस्थेचे चालक तसेच संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने (चिखलवाडी) येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पहिने येथे एका खासगी शैक्षणिक संस्थेच्या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर एक हॉटेल आहे. येथे काजवे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तर शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरुन दमदाटी करतात व छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली.
या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी मुलींना घरी आणण्याची भूमिका घेतली. त्यानंतरच्या घडामोडीत गेल्या रविवारी (दि.१८) वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले. या प्रकाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या मुलींना एकाच वेळी नाही तर वारंवार पर्यटकांसमोर नाचण्यास भाग पाडले जाते. असे येथील एका ग्रामस्थांनी सांगितले.