नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा बालिकेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:53 IST2020-11-20T21:27:30+5:302020-11-21T00:53:41+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात चार दिवसांपूर्वी बिबट्याचे संचार क्षेत्र असलेल्या अधरवड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेची शिकार झाली असतानाच शुक्रवारी (दि.२०) पुन्हा चार ते पाच किमी अंतरावर दुसरी हृदयद्रावक घटना घडली आहे.

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा बालिकेचा बळी
घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात चार दिवसांपूर्वी बिबट्याचे संचार क्षेत्र असलेल्या अधरवड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेची शिकार झाली असतानाच शुक्रवारी (दि.२०) पुन्हा चार ते पाच किमी अंतरावर दुसरी हृदयद्रावक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पिंपळगाव मोर शिवारातील एका सहा वर्षीय बालिकेचा बळी गेल्याने परिसर हादरला आहे.
पिंपळगाव मोर शिवारात जंगलालगत असलेल्या वस्तीवर दोन लहान मुलांसोबत सहा वर्षीय बालिका शौचास गेलेली असताना बिबट्याने अचानक झडप घालून मुलीस ओढत नेले. सोबतच्या मुलांनी आरडाओरड करताच मुलीचे आजोबा अमृता ढवळू गांगड यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याने न जुमानता बालिकेस जंगलात ओढत नेले. शुक्रवारी (दि.२०) सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुर्दैवाने त्या बालिकेचे धड व शीर दोन ठिकाणी आढळून आले. कविता आनंद मधे असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव असून, ती आपल्या कुटुंबासमवेत घोटी-भंडारदरा मार्गावरील पिंपळगाव मोर शिवारातील भैरवनाथ मंदिराच्या वनविभागाच्या वस्तीत राहत होती. गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने तिला जबड्यात धरून फरफटत नेले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, पश्चिम भाग वनविभागाचे रेस्क्यू टीम पथक बिबट्याच्या शोधासाठी गस्त घालत आहेत.