गिरीश महाजन कुंभमेळामंत्री

By Admin | Updated: December 27, 2014 00:55 IST2014-12-27T00:55:01+5:302014-12-27T00:55:01+5:30

मुख्यमंत्र्यांची घोषणा : नाशिक महापालिकेचा आर्थिक बोजा कमी

Girish Mahajan Kumbh Mela Minister | गिरीश महाजन कुंभमेळामंत्री

गिरीश महाजन कुंभमेळामंत्री

नाशिक : तोंडावर येऊन ठेपलेल्या सिंंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता, राज्य सरकारने खर्चाचा अधिकचा वाटा उचलण्याची जबाबदारी घेतली असून, कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी गिरीश महाजन यांना कुंभमेळामंत्री म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘लोकमत’च्या बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी फडणवीस बोलत होते. सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपलेला असतानाही पाहिजे त्या प्रमाणात कामे सुरू नसल्याचे व विशेष करून शहरात एकाच वेळी लाखो भाविकांची गर्दी होणार असल्याने सारी तयारी साधु-महंतांबाबतच सुरू आहे, परंतु शहरवासीयांच्या आरोग्यावर त्यावेळी ताण पडून त्याची काळजी घेण्याबाबत काहीच हालचाल प्रशासनाकडून दिसत नसल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, कुंभमेळा हा प्रथा व परंपरेचा अविष्कार आहे. आमचे सरकार सत्तेवर आत्ताच आले असल्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फारसा वेळ नसला तरी, आत्तापर्यंत उच्चाधिकार समितीच्या दोन बैठका घेऊन आपण कामकाजाचा आढावा घेतला आहे.
प्रशासकीय यंत्रणेचे कामकाज योग्य दिशेने सुरू असून, नाशिक महापालिकेने कुंभमेळा कामासाठी येणारा खर्च उचलण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता अधिकचा भार उचलणार असून, कुंभमेळ्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे सांगून, जानेवारी महिन्यात आपण स्वत: नाशिकला येऊन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Girish Mahajan Kumbh Mela Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.