...सब मिल के कचरा उठाना
By Admin | Updated: November 24, 2014 00:00 IST2014-11-23T23:59:48+5:302014-11-24T00:00:39+5:30
हरित कुंभ नियोजन समिती : पथनाट्य स्पर्धेद्वारे रामकुंडावर प्रबोधनासह स्वच्छता मोहीम

...सब मिल के कचरा उठाना
नाशिक : ‘साथी पेड लगाना, सब मिल के कचरा उठाना...,’ ‘शहर हमारा घर हैं इसे साफ-सुथरा रखना हमारा कर्तव्य हैं...,’ ‘करूया गोदामाई स्वच्छ, राहू या निरोगी मस्त..,’ असा संदेश रामकुंडावर विविध महाविद्यालयांच्या पथनाट्य सादरीकरण करणाऱ्या संघांनी दिला.
हरित कुंभ नियोजन समितीच्या वतीने रामकुंडावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी बारा संघांनी एकापेक्षा एक सरस पथनाट्य सादर करत गोदाकाठावरील भाविकांचे लक्ष वेधले. यावेळी जल, वायू व ध्वनिप्रदूषणाबाबत जनप्रबोधन करण्यावर तरुणाईकडून पथनाट्यांद्वारे भर देण्यात आला. दरम्यान, सारडा सर्कल येथील युथ नॅशनल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श अध्यापक महाविद्यालय, नांदगाव अध्यापक महाविद्यालय, एस. एम. जोशी अध्यापक विद्यालयांच्या संघांकडून सादर करण्यात आलेले पथनाट्य बक्षीसपात्र ठरले. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सरोज जगताप, हरित कुंभ समिती सदस्य राजेश पंडित, निशिकांत पगारे आदि मान्यवर उपस्थित होते. निवड करण्यात आलेल्या प्रमुख चार संघांना डवले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.