भाताला रास्त भाव मिळवा, शेतकरी प्रतीक्षेत
By Admin | Updated: November 16, 2016 14:58 IST2016-11-16T14:43:33+5:302016-11-16T14:58:02+5:30
मजूरांची अन पैशांची टंचाई यातून दिमाखाने मार्ग काढणाऱ्या बळीराजाला आता भाताला रास्त भाव मिळावा याची प्रतीक्षा लागली आहे. इगतपुरी येथील शेतक-याला भाताला रास्त भाव मिळावा, याची अपेक्षा

भाताला रास्त भाव मिळवा, शेतकरी प्रतीक्षेत
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - इगतपुरी तालुक्यात भात हे आपले मुख्य पीक असून, या पिकावरही हवामान तसेच इतर सामाजिक घटकांचेही विविध परिणाम होत आहेत, त्यावर उपाय शोधण्यासाठी येत्या काळात गरजेनुसार पारंपरिक पद्धतीतील बदलांचा अवलंब करून उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत प्रगतीपथावर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामात लागवड केलेल्या भातसोंगणीची लगबग आता सुरू झाली आहे. काही ठिकाणी भातसोंगणी होऊन शेतकऱ्यांनी खळ्यावर सुरक्षित भात नेऊन ठेवलेले आहेत.
एकिकडे केंद्रशासनाने चलनातील 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने मजुरांना देण्यासाठी पैसेच उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झालेली असताना इगतपुरी तालुक्यातील मौजे आधारवड येथील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करीत आहेत. मंडळ कृषि अधिकारी अरविंद पगारे, कृषी पर्यवेक्षक अशोक आल्हाट, कृषि सहाय्यक रणजित आंधळे त्यांना विशेष मार्गदर्शन करीत आहेत.
मजूरांची अन पैशांची टंचाई यातून दिमाखाने मार्ग काढणाऱ्या बळीराजाला आता भाताला रास्त भाव मिळावा याची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यात 126 महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांमधील शेतकरी प्रामुख्याने भात हे पिक घेतात. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी एक हजार आठ या जातीची भातपिके घेतली होती. इगतपुरी तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या योगदानाने यावर्षी भातशेतीची उत्पादकता वाढण्यास मोठी मदत मिळाली असून ह्या भात पिकास आता अधिक भाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे.
तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात भातलागवड केलेले सर्वसाधारण क्षेत्र 23 हजार 332 हेक्टर होते तर खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य 31 हजार 171 एवढे होते. भाताला हमीभाव मिळण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहे.पण अजूनही त्याची प्रतीक्षा कुठे संपलेली नाही.गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अवकाळी पावसाने अनेक शेतक-यांच्या भातपिकाचे नुकसान झाले होते, उत्पादनात देखील मोठी घट निर्माण झाली होती.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषि विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
जमिनीचे आरोग्य खालावतेय
रासायनिक खते, बदलते हवामान यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. जमिनीचा गुणधर्म, स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी, पिकांना खत मात्राची शिफारस आदी मार्गदर्शन शेतकऱ्याना दिले गेल्याने भाताची उत्पादन क्षमता देखील वाढली आहे. -अरविंद पगारे, मंडळ कृषि अधिकारी