गीतरामायण म्हणजे चमत्कार
By Admin | Updated: March 30, 2015 00:42 IST2015-03-30T00:39:52+5:302015-03-30T00:42:02+5:30
अभय माणके : सावाना वार्षिक समारंभ उत्साहात

गीतरामायण म्हणजे चमत्कार
नाशिक : गीतरामायणाची निर्मिती होताना कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीत झाले नसतील एवढे चमत्कार अनुभवायला मिळाल्याने गीतरामायणाची निर्मिती म्हणजे निसर्गाचा चमत्कारच असल्याचे मत गायक अभय माणके यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित १७५ व्या वार्षिक समारंभात आयोजित गीतरामायणामागील रामायण या विषयावर ते बोलत होते. इंदूर येथील गायक अभय माणके व अमृता माणके यांनी आपल्या सुरेल आवाजात गीतरामायणातील गीत सादर करीत कार्यक्रमात रंग भरला. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे’ अशी गीते हिंदी आणि मराठीत सादर करीत उलगडलेले त्यामागील प्रसंग रसिकांची दाद घेऊन गेले. गीत सुरू असतानाच त्या गीताविषयीचे रंजक किस्सेही माणके यांनी कथन केले.
सीताकांत लाड यांनी आकाशवाणीत रुजू होताना पहिल्याच दिवशी गीतरामायण कार्यक्रमाची योजना आखली. त्यानुसार त्यांनी गदिमा आणि सुधीर फडके यांना दूरध्वनीवरून त्या कार्यक्रमाची माहिती देत सुरुवातीला चारच गाणे तयार करण्याची विनंती केली;परंतु पहिल्याच गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की त्यासाठी आलेल्या पत्रांनी तीन खोल्या भरल्या. हे पाहून मग हा कार्यक्रम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी लागणाऱ्या कालावधीत सर्व कलावंतांच्या तसेच आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या.
या कलाकृतीचे ऐकून ५७ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. गदिमा यांनी यातील ५६ गीते ५६ रागांत रचून आणि फडके यांनी ते गाउन एक इतिहासच निर्माण केल्याचे माणके म्हणाले. याप्रसंगी त्यांनी गीतरामायणामागील अनेक घटना उलगडून सांगितल्या. यासाठी त्यांना सुभाष दसककर (संवादिनी), नितीन वारे (तबला), रवि सालके (की बोर्ड), अमित भालेराव (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन केले. विलास औरंगाबादकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)