विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थांनी दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:48 IST2019-04-02T17:46:40+5:302019-04-02T17:48:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील खोपडी खुर्द शिवारात विहिरीत पडून जखमी झालेल्या मोराला ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. वनविभागामार्फत मोरावर उपचार करून मोहदरी-माळेगाव वनोद्यानात ठेवण्यात आले आहे.

विहिरीत पडलेल्या मोराला ग्रामस्थांनी दिले जीवदान
खोपडी खुर्द शिवारातील शेतकरी पंडित भाऊराव दराडे यांच्या विहिरीत सोमवार (दि.१) रोजी सकाळी अकराच्या सुमारास मोर पडलेला असल्याचे आढळून आले. विहिरीत पाणी कमी असल्यामुळे मोर जखमी झालेला होता. वाढ पूर्ण झालेल्या नर जातीच्या मोरावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. जखमी मोराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, उपचारानंतर हा मोर मोहदरी वनोद्यानात रवाना करण्यात आला.