नाशिक शहराला गार्डन सिटी
By Admin | Updated: November 30, 2014 01:20 IST2014-11-30T01:19:55+5:302014-11-30T01:20:24+5:30
नाशिक शहराला गार्डन सिटी

नाशिक शहराला गार्डन सिटी
नाशिक : नाशिक शहराला देशात गार्डन सिटी म्हणून नावारूपास आणण्याचा आपला प्रयत्न असून, त्यादृष्टीने महिंद्रा आणि रिलायन्स उद्योग समूहाशी आपले बोलणे सुरू आहे. त्यासाठी शहरातील शिवाजी उद्यान, फाळके स्मारक, कुसुमाग्रज उद्यान तसेच गोदापार्क येथील जागेचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
राजगड येथे राज यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. शहरात वर्षभरात आपले नाशिकला सुंदर बनविण्यासाठीचे प्रकल्प प्रत्यक्षात येतील. मागे महापालिकेला आयुक्तच नसल्याने या प्रकल्प करारांना मंजुरी मिळाली नाही. आताचे आयुक्त विकासकामांबाबत सकारात्मक दिसतात. गोदापार्क संदर्भात मागे खासगी कंपनीने सर्वेक्षण केले होते. त्या कंपनीचे अधिकारी आज नाशिकला आले असून, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत.
शहरात ठिकठिकाणी अद्ययावत व विलोभनीय उद्याने महापालिकेच्या माध्यमातून उभारली जाणार आहेत. त्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेतली जाणार असली तरी त्यामुळे ना महापालिकेवर ना नागरिकांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार आहे. यासंदर्भात आपले महिंद्रा व रिलायन्स उद्योग समूहांच्या वरिष्ठांशी बोलणे झाले आहे. पुढील काळात शहरातील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यात येतील. रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्यात येतील. तसेच काही ठिकाणी जेनेरीक औषध दुकानांच्या शाखा उघडण्यात येतील. जेणेकरून जनतेला स्वस्तात औषधे मिळू शकतील. पाथर्डी फाटा येथील फाळके स्मारक, कुसुमाग्रज उद्यान, शिवाजी उद्यान, पेलिकन पार्क, गोदापार्क या ठिकाणी सुसज्ज व तरुण पिढीसह सर्वांनाच हवीहवीशी वाटतील, अशी उद्याने बनवून देशात नाशिकला गार्डन सिटी करण्याचा आपला मानस आहे.
काही महापालिकांमध्ये रस्त्याच्या कामांसाठी मोठ्या कंपन्यांना येऊ दिले जात नाही. स्थानिक ठेकेदार रिंग करतात. आता महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे जर कोणी डिफर पेमेंट (आधी काम नंतर दाम) पद्धतीनुसार काम करणार असेल, तर अशा अनुभवी मोठ्या कंपन्यांना रस्त्यांची कामे दिली जावीत, यासाठी आपण आयुक्तांशी चर्चा केली आहे.
यावेळी महापौर अशोक मुर्तडक, महापालिकेच्या स्थायी सभापती राहुल ढिकले, माजी महापौर अॅड. यतिन वाघ, माजी आमदार नितीन भोसले, डॉ. प्रदीप पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)