नाशिकरोड कारागृहात आढळला गांजा
By Admin | Updated: July 19, 2015 00:51 IST2015-07-19T00:50:37+5:302015-07-19T00:51:49+5:30
नाशिकरोड कारागृहात आढळला गांजा

नाशिकरोड कारागृहात आढळला गांजा
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या शेतामध्ये शेती काम करून पुन्हा कारागृहात घेऊन जाणाऱ्या मुंबईतील खुनाच्या आरोपातील घटनेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडे झडती घेताना गांजाच्या दोन पुड्या मिळून आल्या. कारागृहातील शेती कामात कारागृह पोलिसांच्या निगराणीखाली असलेल्या कैद्याकडे गांजा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सातत्याने कैद्यांकडे व बेवारस स्थितीत मोबाइल मिळून येत असल्याने कारागृह चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी कचरू शेनफडू लोणारी
(वय ३०) याच्यासह काही कैद्यांना शनिवारी सकाळी कारागृहा पाठीमागील चिमणबाग शेतात शेती कामासाठी नेण्यात आले होते. शेती काम झाल्यानंतर दुपारच्या सुट्टीमध्ये शेती काम करणाऱ्या कैद्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात येत होते. कारागृहाच्या प्रवेशद्वारापाशी नियमाप्रमाणे प्रत्येकाची झडती घेत असताना कचरू लोणारी या कैद्याच्या बुटाच्या सॉक्समध्ये ७६ ग्रॅमच्या दोन गांजाच्या पुड्या मिळून आल्या. यामुळे कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अनेकदा गैरप्रकारांमुळे गाजत आहे. कारागृहात मोबाइल फोन, गांजा असे अनेकदा सापडले आहे. याच कारागृहात कैद्यांचा खून करेपर्यंत घटना घडल्या आहेत. यासंदर्भात शासनाकडून अनेकदा सरप्राईज व्हिजिट आणि तत्सम कारवाई केली जात असली तरी ज्यावेळी भेट देणारे पथक येथे त्यावेळी कारागृहात सारे अलबेल असते आणि नंतर मात्र अनेक गैरप्रकार उघडकीस येतात. त्यामुळे शासनाचा कारागृह विभाग याप्रकरणाची कशी दखल घेते याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)