गंगापूर : शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर-गिरणारे, आनंदवल्ली-चांदशी या मोठ्या पुलांवरून गोदावरीच्या पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले होते. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्याने दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र अजूनही लहान पुलांवरील पुराचे पाणी कमी न झाल्याने गंगापूर ते जलालपूर मार्ग अजूनही रहदारीसाठी बंदच आहे.गंगापूर धरणातून शुक्रवारपासून पाणी सोडण्यात येत असून, शनिवार व रविवारच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हजारो क्यूसेक पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले.विशेष करून नाशिककडून गिरणारेकडे जाताना महादेवपूरजवळील मोठ्या पुलावरून जाणारे पाणी कमी झाल्याने हा पूल रहदारीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. तसेच नाशिककडून आनंदवलीमार्गे चांदशीकडे जाणाऱ्या मोठ्या पुलावरूनही पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
पूर ओसरल्याने गंगापूर-गिरणारे वाहतूक पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:46 IST