युती-आघाडीवर इच्छुकांचे भवितव्य
By Admin | Updated: October 12, 2016 23:48 IST2016-10-12T23:39:07+5:302016-10-12T23:48:23+5:30
संभ्रमावस्था : सत्ताधारी मनसेच्या भूमिकेकडे लक्ष

युती-आघाडीवर इच्छुकांचे भवितव्य
नाशिक : होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी आगामी काळात युती-आघाडीवरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. युती-आघाडी झाल्यास अनेकांचा पत्ता कापला जाण्याची भीती असल्याने बदलणाऱ्या समीकरणांबाबत संभ्रमावस्था असून, सत्ताधारी मनसेच्या भूमिकेकडेही राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून आहे.
महापालिका निवडणुकीसाठी यंदा चार सदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना व भाजपा यांनी युती न करता स्वतंत्रपणे लढा दिला होता. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली होती. राज ठाकरे यांच्या मनसेनेही स्वतंत्रपणे लढत सर्व जागांवर उमेदवार दिले होते. त्यात मनसेचे ४०, शिवसेना व रिपाइंचे २२, राष्ट्रवादीचे २०, कॉँग्रेसचे १५, भाजपाचे १४, जनराज्यचे २, माकपाचे ३ तर अपक्ष ६ उमेदवार निवडून आले होते. सेना-भाजपा युती तुटल्याने त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला होता. भाजपाने कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा आणि संघटनशक्ती वाढविण्याचा आग्रह कायम ठेवला आणि स्बबळावर नशीब आजमावत आपल्या १४ जागा राखल्या होत्या.
आता फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत सेना-भाजपात युती होते किंवा नाही याबाबत संभ्रमावस्था असून, वेगवेगळ्या पातळीवर चर्चा केली जात आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मात्र आघाडीचे संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाल्यास इच्छुक अनेक परंतु जागा कमी, अशी स्थिती समोर येणार आहे. त्यामुळे ऐनवेळी पत्ता कापला जाण्याचा धसका इच्छुकांनी घेतला आहे. त्यात काही विद्यमान नगरसेवकांचाही पत्ता कापला जाण्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली असल्याने त्यांच्याही पोटात गोळा उठला आहे.
युती अथवा आघाडी झाल्यास उमेदवारी वाटपाबाबत राजकीय पक्षांची कसोटी लागणार आहे. मात्र, सध्या सेना-भाजपातील तणावपूर्ण संबंध पाहता आणि स्थानिक पातळीवरही भाजपा पदाधिकाऱ्यांची सेनेविरुद्ध आक्रमक भूमिका पाहता युती न होण्याचीच चर्चा होत आहे. दरम्यान, सत्ताधारी मनसेची दोलायमान स्थिती असून, मनसे कुणाबरोबर युती करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मनसे-भाजपा तसेच सेना-मनसे एकत्र येण्याच्याही चर्चा ऐकायला मिळत आहेत. मनसेबरोबर भाजपाच्या युतीची चर्चा जोर धरून आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)