मिळकतींचे भवितव्य महासभेच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:20 IST2018-11-24T00:05:04+5:302018-11-24T00:20:23+5:30
महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे.

मिळकतींचे भवितव्य महासभेच्या हाती
नाशिक : महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे.
स्थायी समितीची बैठक गुरुवारी (दि.२२) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मनपाच्या मिळकती अनेक राजकीय नेत्यांना नाममात्र दराने देण्यात आले आहेत. एकूण नऊशे मिळकती मनपाच्या मालकीच्या असून, त्याला भाडे ठरविण्याचे कायद्याने अधिकार आयुक्तांना आहेत, मात्र त्यांना बारा महिने कालावधीसाठीच मिळकत भाड्याने देता येते त्यापेक्षा अधिक कालावधीसाठीचे अधिकार स्थायी समितीला असून, ते आयुक्तांना हस्तांतरित करण्याचा विषय होता.
दरम्यान, स्थायी समितीने गेल्या बैठकीत घंटागाडीच्या ठेक्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्याचे ठरवले होते, परंतु त्याचा उल्लेख गुरुवारी सादर करण्यात आलेल्या इतिवृत्तात नसल्याने मुशिर सय्यद आणि अन्य सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले अखेरीस सभापतींनी त्यानुसार कार्यवाही करण्याचे ठरवले. याशिवाय अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या चौकशी अहवालास होत असलेल्या दिरंगाईवर चर्चा झाली.
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने त्याचे एकूणच परिणाम स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. मुंढे यांची बदली झाल्याने आता मुक्तपणे काम करा, असे दिनकर पाटील यांनी अधिकाऱ्यांना टोले लगावले.