‘त्या’ ३४ शिक्षकांचे भवितव्य अधांतरी
By Admin | Updated: June 1, 2017 01:28 IST2017-06-01T01:28:20+5:302017-06-01T01:28:32+5:30
नाशिक : आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या ३४ प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अधांतरी सापडल्याचे वृत्त आहे.

‘त्या’ ३४ शिक्षकांचे भवितव्य अधांतरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आंतरजिल्हा बदलीने नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या ३४ प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अधांतरी सापडल्याचे वृत्त आहे.
या शिक्षकांना रुजू करून घेण्याऐवजी आल्यापावली पुन्हा धुळे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही सभेत उपस्थित भाजपा गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केल्यानंतर शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी ही नोकर भरतीच बेकायदेशीर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. शिक्षक बदल्यांबाबत वेगवेगळे शासन निर्णय असताना अशा अचानक एकदम ३४ प्राथमिक शिक्षकांच्या धुळे जिल्हा परिषदेकडून नाशिक जिल्हा परिषदेकडे आंतरजिल्हा बदल्या कशा करण्यात आल्या? त्यासाठी रोस्टर तपासणी करण्यात आली होती काय? रोस्टरनुसार त्या त्या संवर्गात शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे या ३४ प्राथमिक शिक्षकांना नाशिक जिल्हा परिषदेकडे रुजू करून घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना काय निर्णय घेतात, याकडे जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.