अनामत रकमेसाठी पराभूतांच्या चकरा
By Admin | Updated: July 5, 2017 01:02 IST2017-07-05T01:01:50+5:302017-07-05T01:02:26+5:30
नाशिक : पराभूत परंतु अनामत रक्कम वाचलेल्या उमेदवारांना त्यांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

अनामत रकमेसाठी पराभूतांच्या चकरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिका निवडणूक प्रक्रिया संपून चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी पराभूत झालेल्या, परंतु अनामत रक्कम वाचलेल्या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम देण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. मनपाच्या निवडणूक शाखेकडे दररोज चकरा मारून पराभूत उमेदवार वैतागले आहेत.
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. निवडणुकीत १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांच्या अनामत रकमेच्या माध्यमातून महापालिकेकडे ६७ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम जमा झाली होती. दरम्यान, अनेक पराभूत उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. तर ज्यांची अनामत रक्कम वाचली त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून महापालिकेच्या निवडणूक शाखेकडे लकडा लावला आहे.
निवडणूक शाखेकडे रोज आठ ते दहा पराभूत उमेदवार अनामत रक्कम परत मिळावी यासाठी विचारणा करताना दिसून येत आहेत परंतु, वेगवेगळी कारणे देत उमेदवारांना माघारी पाठविले जात आहे. त्यामुळे रोज चकरा मारून पराभूत उमेदवार वैतागले आहेत. त्यातील काही उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, त्यांना चकरा मारणेही न परवडणारे झाले आहे.
निवडणूक शाखेच्या या अनागोंदी कारभाराबद्दल पराभूत उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महापालिकेने सदर अनामत रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.