बिबट्याला समोर पाहून दुचाकीस्वारांची पाचावर धारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:06 IST2018-11-06T16:05:40+5:302018-11-06T16:06:44+5:30
सिन्नर : अंत्यविधीचा निरोप देण्यासाठी वस्तीवर गेलेल्या दुचाकीस्वारांना समोर रस्त्यावर बिबट्या आडवा येताच पाचावर धारण बसलेले दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन खाली पडले.

बिबट्याला समोर पाहून दुचाकीस्वारांची पाचावर धारण
सिन्नर : अंत्यविधीचा निरोप देण्यासाठी वस्तीवर गेलेल्या दुचाकीस्वारांना समोर रस्त्यावर बिबट्या आडवा येताच पाचावर धारण बसलेले दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन खाली पडले. सुदैवाने बिबट्याने त्यांच्यावर हल्ला न केल्याने त्यांचे प्राण वाचले. सिन्नर तालुक्यातील कासारवाडी शिवारात मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. चास-रामवाडी येथील ज्ञानेश्वर नामदेव जाधव व संतोष नारायण मोहिते हे दोघे युवक अंत्यविधीसाठी कासारवाडी शिवारातील गणेशखिंड भागात गेले होते. तेथून परत येत असतांना त्यांना भगवान देशमुख यांच्या वस्तीजवळ रस्त्यावर बिबट्या आडवा आला. अचानक बिबट्या समोर दिसताच त्यांची पाचावर धारण बसली. त्यानंतर दोघे दुचाकीहून खाली पडले. बिबट्याने मात्र त्यांच्यावर हल्ला न करता शेजारील ऊसाच्या शेतात निघून जाणे पसंत केले. त्यानंतर कसबसे पुन्हा उठून दोघांना दुचाकी घेऊन जवळच्या वस्तीवर आधार घेतला. दुचाकीहून पडलेल्या दोघांच्या हात व पायांना गंभीर मार लागला आहे. घटनेची माहिती वनविभागास दिल्यानंतर नांदूरशिंगोटेचे वनपाल पी. ए. सरोदे, वनरक्षक के. आर. इरकर, तानाजी भुजबळ व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी जावून जखमी युवकांची विचारपूस केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वनवनविभागाने कासारवाडी शिवारात देशमुख यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावला आहे.