भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा
By Admin | Updated: January 17, 2015 00:25 IST2015-01-17T00:19:16+5:302015-01-17T00:25:00+5:30
भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा

भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा
नाशिकरोड : मुद्रणालयातील खासगीकरण व कंत्राटीकरणाचे काम बंद करून कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस रामभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा काढण्यात आला होता. महाप्रबंधक टी. आर. गौडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रशासन, महामंडळ व्यवस्थापन व मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी २००८ मध्ये मुद्रणालयाचे महामंडळात रूपांतर करताना त्रिपक्षीय लेखी करार केला होता. त्यामध्ये खासगीकरण, निर्गुंतवणुकीकरण केले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सध्या मुद्रणालयामधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडून होणारी कामे हंगामी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यास सुरुवात केली असून, ही खासगीकरणाची सुरुवात आहे. मुद्रणालय व्यवस्थापनाचे हे कृत्य बेकायदेशीर असून, त्रिपक्षीय कराराचा भंग करणारे आहे. मुद्रणालयातील रिक्त जागेवर स्थानिक बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, कंत्राटी पद्धत बंद करावी, मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी मिळेपर्यंत रोजंदारीवर नियुक्त करावे, नवीन नियुक्ती करताना मयत कामगारांच्या वारसांना प्राधान्य द्यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.
मोर्चामध्ये मजदूर संघाचे माजी कार्याध्यक्ष अशोक गायधनी, विष्णू काळे, जयंत गाडेकर, मधुकर गिते, सईद शेख, अशोक मोजाड, अरुण महानुभाव, अनिल जाधव, दिलीप क्षीरसागर, हिरामण तेजाळे, दिलीप मेढे, निवृत्ती ढोकणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)