दोस्ती व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मैत्रीचा जिव्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:12+5:302021-09-26T04:15:12+5:30

कळवण तालुक्यातील मुळाने येथील माधव वाळू गावित या तरुणाचा गेल्या सहा वर्षांपूर्वी नाशिकला वीज खांबावर काम करताना खाली पडून ...

Friendship through the Friendship WhatsApp Group | दोस्ती व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मैत्रीचा जिव्हाळा

दोस्ती व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून मैत्रीचा जिव्हाळा

कळवण तालुक्यातील मुळाने येथील माधव वाळू गावित या तरुणाचा गेल्या सहा वर्षांपूर्वी नाशिकला वीज खांबावर काम करताना खाली पडून दुर्दैवाने अपघात झाला. त्या अपघातातून माधव सुदैवाने बचावला मात्र, कमरेपासून खाली शरीराने साथ सोडली, अशा परिस्थितीत व्हीलचेअरच्या आधाराने तो हालचाल करतो. परंतु जगायचं कसं हा मोठा प्रश्न माधवसमोर उभा राहिला. माधवच्या डोक्यात किराणा दुकान टाकण्याची कल्पना आली. मात्र, होती नव्हती ती पुंजी पूर्णतः ऑपरेशन करण्यामध्ये खर्च झाली. आई-वडील वयस्कर असल्याने ज्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती तोच माधव हलाखी जीवनापुढे हतबल झाला. पण, तरीही त्याने जगण्याची जिद्द सोडली नाही. कारण, त्याला मित्रांची साथ जगण्यासाठी ऊर्जा देत होती. अशा परिस्थितीत माधवने काशिनाथ पवार यांना फोन करून सगळ्या परिस्थितीबद्दल माहिती सांगितली. पवार यांनी सगळ्या माहितीचा आढावा घेत व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून दोस्ती ग्रुप बनवून सर्व मित्रांना एकत्र केले व माधवबद्दल पूर्ण कल्पना दिली. आणि म्हणतात ना, मैत्रीचा वृक्ष बहरतो तो विश्वासाच्या बळावर. याच मैत्रीच्या नात्यातून मित्रांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासत आवाहन केले. हळूहळू सर्व मित्रांची साथ माधवच्या पाठीशी उभी राहिली आणि माधवसाठी त्यांनी आर्थिक पाठबळ उभे करून दिले. शांताराम जोपळे, काशिनाथ खिल्लारी, काशिनाथ पवार, नंदू महाले, संजय जगताप, वसंत वाघ, पांडुरंग गायकवाड, विलास पालवी, कृष्णा बहिरम, एकनाथ राऊत, नवनाथ चव्हाण, यशवंत भोये, सतीश गाढवे, कैलास चौरे, भगवान दळवी, राजेश भोये, युवराज महाले, वसंत वाघ मित्र परिवार, विलास पालवी मित्र परिवार अशा सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन माधव गावितसाठी २१,२५३/- इतकी रक्कम दुकान टाकण्यासाठी उपलब्ध करून दिली. एकमेकांना साथ देणं, मित्राला समजून घेणं, वेळप्रसंगी मदत करणं, या गोष्टी मैत्रीसाठी पुरेशा असतात आणि या सामाजिक बांधिलकीतून सर्व मित्रांनी माधवसाठी जी मदत केली ती इतर मित्रांसाठी प्रोत्साहन व प्रेरणा देणारी ठरली आहे.

Web Title: Friendship through the Friendship WhatsApp Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.