मोकाट जनावरांवर मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:14 IST2020-04-21T22:14:16+5:302020-04-21T22:14:26+5:30
लासलगाव व परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या संख्येने

मोकाट जनावरांवर मोफत उपचार
लासलगाव : संपूर्ण भारतात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पाळली जात आहे. कुणी गरजवंतांची जेवणाची व्यवस्था करीत आहेत तर कुणी जनावरांच्या चारापाण्याची सोय करीत आहे. याच लॉकडाउनच्या काळात मोकाट जनावरांवर उपचार व देखभाल करण्याचे काम येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोटेगावकर मोफत करीत आहेत.
लासलगाव व परिसरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या संख्येने आहे. या जनावरांची चारापाण्याची सोय अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. या संचारबंदीच्या काळात अनेक ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडत आहे. संचारबंदी असल्यामुळे सर्व नागरिक घरातच आहेत अशा परिस्थितीत बाहेर असलेल्या मोकाट जनावरांवर येथील पशुवैद्यकीय अधिकारी दत्ता मोटेगावकर हे शहरातील गोसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर उपचाराची सेवा करून या मोकाट जनावरांना जीवनदान देत आहेत. आतापर्यंत मोटेगावकर यांनी सहा ते सात मोकाट जनावरांना आजारातून पूर्णपणे बरे केले असून, त्यांना शहरातील मनोज बेदमुथा, गोपी गौर व चिंगू तिवारी यांच्यासह गोसेवकांची मदत होत आहे.