सारूळला घरपट्टी भरल्यास मोफत धान्याचे दळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:56 IST2019-01-30T18:55:43+5:302019-01-30T18:56:42+5:30
नागरिकांना ग्रामपंचायत कर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ज्या व्यक्तींनी ग्रामपंचायत कर भरला असेल त्यांना वर्षभरासाठी धान्य मोफत दळून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. १ जानेवारी २०१९ पासून गावातील ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबातील त्या मुलीच्या आईच्या नावे ग्रामपंचायत सारूळमार्फत ग्रामनिधी फंडातून १० हजार रुपये

सारूळला घरपट्टी भरल्यास मोफत धान्याचे दळण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सारूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या बैठकीत वर्षाची घरपट्टी एकरकमी भरणाऱ्या ग्रामस्थांच्या कुटुंबीयांना वर्षभर मोफत धान्य दळून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढावे यासाठी मुलीच्या जन्मानंतर दहा हजार रुपये ग्रामनिधीतून देण्याचे ठरविण्यात आले.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रखमाबाई डगळे होत्या. या ग्रामसभेत तीन महत्त्वाचे ठराव मांडण्यात येऊन त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली. प्रारंभी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. नागरिकांना ग्रामपंचायत कर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ज्या व्यक्तींनी ग्रामपंचायत कर भरला असेल त्यांना वर्षभरासाठी धान्य मोफत दळून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. १ जानेवारी २०१९ पासून गावातील ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबातील त्या मुलीच्या आईच्या नावे ग्रामपंचायत सारूळमार्फत ग्रामनिधी फंडातून १० हजार रुपये काढून बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल त्यामुळे गावातील मुलींचा जन्मदर वाढीस लोकांना प्रोत्साहन मिळेल. गावातील मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी साहित्य खरेदीस अर्थसहाय्य करणे. यासाठी गावातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास तिच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी सदर व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे २१०० रुपयांचा धनादेश देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी उपसरपंच सदानंद नवले, ग्रामविकास अधिकारी रवींद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य गणपत शिंदे, ज्ञानेश्वर चौधरी, मच्छिंद्र पोटिंदे, शकुंतला नवले, इंदूबाई भोईर, उज्ज्वला पोटिंदे, रेणुकाबाई ससाणे, पोलीस पाटील प्रकाश नवले, बापू नवले, शंकर नवले, मोहन डगळे, रामदास भोईर, भाऊसाहेब नवले, पोपट मुंजे, यशवंत चव्हाण, राजाराम पगारे, विशाल ससाणे आदी उपस्थित होते.