निवडणुकीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: April 8, 2015 23:53 IST2015-04-08T23:52:57+5:302015-04-08T23:53:21+5:30
जिल्हा बॅँक : स्थगिती उठविली

निवडणुकीचा मार्ग मोकळा
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची असलेली स्थगिती बुधवारी (दि.८) द्विसदस्यीय खंडपीठाने उठविली. यासंदर्भात दाखल तीनही याचिका खंडपीठाने फेटाळल्याने आता जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असून, लवकरच निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे.दरम्यान, अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यावरील स्थगिती उठल्याने ही यादी गुरुवारी (दि. ९) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आधी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मार्च रोजीच जिल्हा बॅँकेच्या सभासद मतदारांची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, त्या यादीवर डॉ. गिरीश मोहिते यांच्यासह अन्य दोघांनी हरकत घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काल (दि.८) मुंबई उच्च न्यायालयात द्विसदस्यीय न्या. गवई व न्या. गडकरी यांच्या खंडपीठासमोर या तीनही याचिकांवर सुनावणी होऊन तीनही याचिका फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. विद्यानी यांनी काम पाहिले. आता न्यायालयाने अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास दिलेल्या स्थगिती उठविल्याने जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या वतीने अंतिम करण्यात आलेली मतदारांची प्रारूप यादी गुरुवारी (दि.९) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम पाठविण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)