प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:18 IST2020-07-13T22:19:29+5:302020-07-14T02:18:35+5:30
पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिवसभर मुक्तसंचार असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार
पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिवसभर मुक्तसंचार असल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात योग्य खबरदारी घ्यावी, असे एकीकडे शासनाने सुचविलेले असले तरी दुसरीकडे मात्र कोरोना हॉटस्पॉट ठरल्याने प्रतिबंधित भागात नागरिकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांची दिवसभर वर्दळ प्रतिबंधित क्षेत्रात विविध दुकाने सुरू असून, नागरिकांची दिवसभर वर्दळ असते दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. परिसरातील भराडवस्ती, गौडवाडी, मायको दवाखाना परिसर, गजानन चौक, राहुलवाडी, सम्राटनगर, वैशालीनगर, महाराणा प्रताप चौक, शेषराव महाराज चौक, मनपा शाळा परिसर या भागात लहान मुले, तसेच नागरिक आणि युवकांचे टोळके कायम उभे राहत असल्याने कोरोना हॉटस्पॉट भागात बंदी नावाला असली तरी नागरिकांचा संचार कायम आहे.
----------------
लोखंडी पत्रे आणि लाकडांच्या सहाय्याने रस्ते केले बंद
प्रतिबंधित क्षेत्रात अंतर्गत रस्त्यावर नागरिकांसह वाहनांची सर्रासपणे ये-जा असल्याचे चित्र फुलेनगर कोरोना हॉटस्पॉट भागात दैनंदिन दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी झोपडपट्टी पंचवटी पेठरोडला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात कोरोनाने शिरकाव केला आणि बघताबघता एका पाठोपाठ एक रु ग्ण आढळून आल्याने फुलेनगर भागातील कोरोना परिस्थिती आटोक्यात रहावी यासाठी मनपा आयुक्तांनी पाहणी केली होती. त्यानंतर कोरोना हॉटस्पॉट असल्याने सदर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊन ज्या ज्या भागात रु ग्ण आढळले त्या भागात फलक लावण्यात येऊन तेथील काही रस्ते लाकडी बांबूच्या सहाय्याने बंद करण्यात आले मात्र नागरिकांनी अडथळ्याची शर्यत पार करत कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातून मार्ग काढत इच्छितस्थळी जाणे सुरू ठेवले आहे.
---------------
प्रशासनाकडून डोळेझाक
कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे होत. मात्र प्रशासनाकडून डोळेझाक केल्याचे दिसून येते. दिंडोरीरोडला मायको दवाखाना असून, सकाळी रु ग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. याशिवाय या भागात राहणारे नागरिक कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाही. तोंडाला मास्क लावत नसल्याने दिसून आले, तर मुख्य रस्ते बंद असल्याने अंतर्गत रस्त्याने व पाटकिनार किंवा दत्तनगर रस्त्याने दुचाकी वाहतूक सुरूच आहे.