संचारबंदीतही नागरिकांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:55+5:302021-05-10T04:14:55+5:30
गेल्या १५ एप्रिलपासून शासनाने कडक निर्बंध लादले असले तरी, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे. परिणामी शहर ...

संचारबंदीतही नागरिकांचा मुक्तसंचार
गेल्या १५ एप्रिलपासून शासनाने कडक निर्बंध लादले असले तरी, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे पावलोपावली जाणवू लागले आहे. परिणामी शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळत नसल्याची एकीकडे तक्रार केली जात असतांना दुसरीकडे मात्र घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी, रिक्षा सुरूच असून, चार ते पाच प्रवासी घेऊन त्यांचा प्रवास सुरू आहे तर खासगी वाहनांमध्येही चार ते पाच व्यक्ती प्रवास करीत आहेत. रविवारी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर हे चित्र दिसून आले. मध्यवर्ती असलेल्या रविवार कारंजा, शालिमार चौक, शिवाजीरोड, अशोकस्तंभ, शरणपूररोड या भागात वाहनांची गर्दी नियमित होती. तर सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोडकडून येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या दुचाकीची संख्या सर्वाधिक होती. मुळातच संचारबंदी असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना नागरिकांचा मुक्त संचार कायम दिसून आला.
सिडकोत सारे आलबेल
सिडकोत रविवारी सकाळी ११ वाजेनंतरही अनेक दुकाने उघडी हाेती. तर अनेकांनी तात्पुरते शटर बंद करून व्यवसाय सुरूच ठेवले होते. किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. परंतु त्यानंतरही दुकाने उघडी असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र होते. सिडकोतील अनेक घर मालकांनी त्यांच्या पुढच्या बाजूला दुकाने व मागच्या बाजूला राहण्याची व्यवस्था केली असल्याने अनेक दुकानदार हे व्यवसायासाठी पुढचा दरवाजा उघडा ठेवून व्यवसाय करीत हाेते.