बनावट मृत्यूपत्राद्वारे फसवणूक; संशयितांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2015 22:57 IST2015-11-03T22:55:57+5:302015-11-03T22:57:27+5:30
बनावट मृत्यूपत्राद्वारे फसवणूक; संशयितांवर गुन्हा

बनावट मृत्यूपत्राद्वारे फसवणूक; संशयितांवर गुन्हा
नाशिक : स्थावर मालमत्तेचे बनावट कागदपत्र तसेच मालकाचे खोटी सही, अंगठा घेऊन बनावट मृत्यूपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या पाच संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या संशयितांमध्ये एका बांधकाम व्यवसायिकाचाही समावेश आहे़
सरला पंडित मौले
(४५, गणेशनगर, खंडेराव मंदिरामागे, ओझर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडील मुरलीधर नारायण काठे यांच्या मृत्यूनंतर वारस हक्काप्रमाणे त्यांचे व भाऊ-बहिणींचे नाव लागले होते़ मात्र भाऊ यादव मुरलीधर काठे, प्रकाश मुरलीधर काठे यांनी बनावट कागदपत्र व वडिलांची खोटी सही व अंगठा असलेले मृत्यूपत्र तयार केले़ तसेच ही मिळकत संशयित पुंडलिक रामचंद्र बनकर, दत्तू मुरलीधर मोरे, बांधकाम व्यावसायिक रवि महाजन व डॉक्टर (नाव, पत्ता माहित नाही) यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे हडप करण्यासाठी महसुली दप्तरातील नाव कमी करून फसवणूक केली़
याबाबत सरला मौले यांनी न्यायालयात धाव घेतली़ अॅड़ सचिन बच्छाव व अॅड़ शशिकांत गायकवाड यांनी मौले यांची न्यायालयात बाजू मांडली असता न्यायाधीश कोळपकर यांनी सरकारवाडा पोलिसांनी पाच संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़ दरम्यान, संबंधित जागेवर बांधकाम व्यवसायिक रवि रघुनाथ महाजन यांनी बेकायदेशीरपणे आम्रपाली टॉवरची उभारणी करून कोट्यवधींची रुपयांची अफरातफर व वारसांची फसवणूक केल्याचेही मौले यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे़ (प्रतिनिधी)