सलग चौथ्या दिवशी अवकाळीने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:37 IST2021-03-23T22:54:38+5:302021-03-24T00:37:27+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२०) ते मंगळवार (दि.२३) पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

सलग चौथ्या दिवशी अवकाळीने झोडपले
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शनिवारी (दि.२०) ते मंगळवार (दि.२३) पर्यंत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. निसर्गाच्या या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
मंगळवारी (दि.२३) सायंकाळी सहाच्या सुमारास तळवाडे दिगर, किकवारी, केरसाने, दसाने परिसरात वादळी वारा, वीजांचा कडकडाट व जोरदार गारपीट झाल्याने कांदा, टोमॅटो, टरबुज, भाजीपाला, गहू, हरभरा पिकांचे पुन्हा प्रचंड नुकसान झाले आहे.
केरसाने येथे जास्त प्रमाणात गारपीट झाली असून तिथे गराचा अक्षरशः खच साचला होता. परिसरातील जवळपास ९० टक्के कांदा पिकाची लागवड केली असून, काही ठिकाणी कांद्याचे पीक जोमात आहे. काही ठिकाणी काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला.
भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. गहू, हरभरा, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपिटीची सर्वाधिक झळ कांद्यासह भाजीपाला पिकांना बसली आहे. या गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
(२३ जोरण १, २)
बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे टोमॅटो, कांदा पिकाचे नुकसान.