राज्यातील चौदा हजार पुलांची होणार दुरुस्ती
By Admin | Updated: February 28, 2017 01:30 IST2017-02-28T01:30:20+5:302017-02-28T01:30:36+5:30
ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली.

राज्यातील चौदा हजार पुलांची होणार दुरुस्ती
नाशिक : सावित्री नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर सरकारला जाग आली असून, ब्रिटिशकालीन लहान-मोठ्या अशा एकूण चौदा हजार पुलांच्या दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली.
नाशिकमधील सार्वजनिक बांधकाम भवन येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी सदर माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. रायगड जिल्ह्णातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची दुर्घटना महाड शहराजवळ आॅगस्ट महिन्यात घडली होती. या घटनेनंतर राज्यातील जुन्या पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. या घटनेने सरकारला हादरा बसल्याची कबुली देत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीमार्फत बांधकामाचे परीक्षण करून राज्यातील एकूण १४ हजार पुलांच्या स्थितीचा अहवाल सरकारने प्राप्त करून घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात जे पूल अत्यंत जीर्णावस्थेत आहे त्यांची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
चालू वर्षासाठी पुलांच्या दुरुस्तीकरिता एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांमध्ये राज्यातील एकूण चौदा हजार
पुलांची दुरुस्ती व बांधणी
करण्यात सरकारला यश येईल, असे पाटील म्हणाले. या दुरुस्तीच्या कामासाठी विहित प्रक्रियेद्वारे संबंधित बांधकाम ठेकेदारांची निवड करावी जेणेकरून दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण होतील, असेही पाटील
यांनी यावेळी अधिकाऱ्यांना
सांगितले.