सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना दहा वर्षे कारावास
By Admin | Updated: September 3, 2015 23:22 IST2015-09-03T23:22:42+5:302015-09-03T23:22:58+5:30
निफाड येथील जिल्हा अपर सत्र न्यायालयाचा निकाल

सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना दहा वर्षे कारावास
लासलगाव : पिंपळगाव बसवंत येथील सतरा वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने चौघांना दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायाधीश अ. ज. मंत्री यांनी ठोठावली आहे. या प्रकरणी पुराव्याअभावी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पिंपळगाव येथील युवती एका मोटार विक्री दुकानात संगणक आॅपरेटर तसेच मुंबई येथे फिल्म साईड डान्सर म्हणून काम करते. दि. २७ जून २०१३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चिंचखेड चौफुलीवर मित्र रोहित ऊर्फ किरण पाटील याने नाशिक येथे पंचवटी कारंजा परिसरातील उमिया आशिष अपार्टमेंटमध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर सागर आवारे , उमेष चव्हाण व केतन सोनवणे यांनी जबरदस्ती केली. त्यानंतर पहाटे व सकाळी दहा वाजता नितीन चव्हाणसह अन्य संशयितांनी अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणीने दि. २९ जून २०१३ रोजी पोलिसांत दाखल केली. त्यानुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
निफाड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात डी. के. शेळके यांच्यासह २१ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. खटल्यात किरण प्रकाश पाटील, उमेश संतोष चव्हाण, नितीन मोहन चव्हाण, केतन अशोक सोनवणे यांना दहा वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पुराव्याअभावी सागर दिलीप आवारे, बंटी ऊर्फ महेंद्र विनायक पानकर , जय ऊर्फ विशाल रामराव सोनवणे व सचिन तुकाराम वराडे या चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील व्ही. एन. हाडपे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)