सिन्नर: तालुक्यातील विंचूरदळवी येथे ट्रॅक्टर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पाठलाग करून घोरवड घाटात पकडले. त्यानंतर, या चौघा संशयितांना सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विंचूरदळवी-पांढुर्ली रस्त्यावरील भोर मळा येथे बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित चोरट्यांनी सुरुवातीला चोरट्यांनी विंचूरदळवी गावाजवळील कानडे मळा येथील कल्पेश कानडे यांच्या ट्रॅक्टरचे फाळके चोरले. त्यानंतर, त्यांनी आपला मोर्चा भोर मळा येथे वळविला. या ठिकाणी ट्रॅक्टरजवळ अचानक आवाज आला. घराच्या खिडकीजवळच झोपलेल्या दत्तू रामा भोर यांना जाग आली. त्यांनी घराच्या बाहेर धाव घेत आरडाओरड केली. भोर यांनी घरातील सर्वांना जागे केले, तेव्हा चोरट्यांनी चोरलेल्या काही वस्तू जागेवर टाकून पळ काढला.
भोर यांनी घरातील व शेजारच्यांच्या मदतीने पाठलाग करून चोरांना घोरवड घाटाजवळ पकडले. ग्रामस्थांना संशयित चोरट्यांना चोरीने बांधून ठेवले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले.
या घटनेत अर्जुन सूरज रोही (२०), आदित्य सुधीर सौदे (१८), अनिकेत अनिल उमाप (२०) व जुबेर रुस्तम खान (२०) सर्व रा.भगूर या संशयितांना सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ शिरोळे अधिक तपास करीत आहेत.