चार शिक्षक; तीन खोल्या
By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:13:39+5:302014-12-25T23:30:18+5:30
उपआयुक्तांना निवेदन : मनपा उर्दू हायस्कूलमधील प्रकार

चार शिक्षक; तीन खोल्या
वडाळागाव : येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयाची पटसंख्या दिवसेंदीवस वाढत आहे. सध्या आठवी ते दहावीपर्यंत एकूण २३५ विद्यार्थी अवघ्या तीन खोल्यांमध्ये शिक्षण घेत असून, त्यांना केवळ चार शिक्षक ज्ञानदान करत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. शाळेत विविध सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे आरोग्यही धोक्यात आल्याची तक्रार संतप्त पालकांच्या शिष्टमंडळाने उपआयुक्त दत्तात्रय गोतिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१९९७ सालापासून वडाळागावात अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका प्रशासनाने उर्दू माध्यमिक विद्यालय सुरू केले आहे; मात्र या विद्यालयाच्या बाबतीत नेहमीच पालिकेची उदासीन भूमिका असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विद्यालयामध्ये अद्याप शिपाई व लिपिकदेखील पालिका प्रशासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने उपलब्ध करून दिलेले नाही. तसेच पिण्याच्या पाण्यापासून तर स्वच्छतागृहांपर्यंत विविध सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरदेखील विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या शाळेचा दहावीचा निकाल हा साठ टक्क्याच्या पुढेच लागत असून, दिवसेंदीवस येथील शैक्षणिक दर्जा सुधारत आहे.
याबरोबरच विद्यार्थीसंख्याही वाढत असून, सध्या आठवी व नववीच्या वर्गात प्रत्येकी ९६, तर दहावीच्या वर्गात ४३ असे एकूण २३५ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. एकीकडे शाळा-विद्यालयांमध्ये केंद्र सरकार स्वच्छतागृहांची सक्ती करत असताना दुसरीकडे महापालिका याबाबत उदासीन भूमिका घेत असल्याचा आरोप निवेदनात पालकांनी केला आहे.
वारंवार मागणी करूनदेखील शाळेमधील समस्या सोडविल्या जात नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गोतिसे यांना याबाबत निवेदन देऊन लक्ष वेधले. तीन दिवसांमध्ये सर्व समस्या सोडविल्या जातील व स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करून वाढीव शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी पालकांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.
समितीचे अध्यक्ष शकील इनामदार, नागरिक पालकसंघाचे आसीफ गुलामगौस, हसन शेख, नुर खान, फरीन खान, नसीम खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)