महापौरपदानंतर चौघांना आमदारकीची झूल
By Admin | Updated: January 20, 2017 23:41 IST2017-01-20T23:40:44+5:302017-01-20T23:41:03+5:30
दोघांना हूल : कॉँग्रेसच्या बच्छाव यांना मंत्रिपदाचा लाभ

महापौरपदानंतर चौघांना आमदारकीची झूल
नाशिक : महापालिकेत सर्वोच्च असे महापौरपद भूषविल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटतात आणि पुढे विधानसभेत जाण्याचे वेध लागतात. नाशिक महापालिकेतही महापौरपद उपभोगल्यानंतर सहा पैकी चौघांच्या अंगावर आमदारकीची झूल चढली आहे, तर दोहोंना आमदारकीने हूल दिली आहे. यामध्ये कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी तर थेट मंत्रिपदाला गवसणी घातली आहे. महापालिकेत नगरसेवकापासून सुरू होणारा प्रवास हा प्रत्येक राजकारण्याला महापौरपदापर्यंत घेऊन जाण्यासाठी खुणावत असतो. सर्वोच्च अशा महापौरपदाचा बहुमान मिळाल्यानंतर राजकारणातील पुढची इयत्ता असते ती आमदारकीची. नाशिक महापालिकेत प्रथम व द्वितीय महापौरपद भूषविणारे शांतारामबापू वावरे व पंडितराव खैरे यांनी अगोदर आमदारकीसाठी प्रयत्न केले, नंतर ते महापौर बनले. तर १९९५-९६ या वर्षी अपक्ष असताना महापौरपद भूषविणारे उत्तमराव ढिकले यांनी पुढे आधी शिवसेनेकडून लोकसभा लढवत खासदारकी मिळविली तर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी करताना आमदारकी प्राप्त केली. त्यानंतर १९९७-९८ या वर्षी महापौरपद भूषविणारे त्यावेळी सेनेत असलेल्या वसंत गिते यांनी सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करत विजय संपादन केला. १९९९-२००२ या काळात पहिल्या महिला महापौरपदाचा मान मिळविलेल्या कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या लढतीत विजय प्राप्त केला. त्यानंतर त्यांच्या पदरात आरोग्य खात्याचे राज्यमंत्रिपद पडले होते. सन २००५-०७ या काळात महापौरपद भूषविणाऱ्या भाजपाच्या बाळासाहेब सानप यांनी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी करत विजयश्री मिळविली. महापौरपद भूषविलेल्या या चार महापौरांना विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य वाट्याला आले. मात्र, सन २००२-०५ या काळात सेनेकडून महापौरपद भूषविलेल्या दशरथ पाटील यांनी नंतर सेनेकडून लोकसभा निवडणूक लढविली परंतु त्यांचा १४ हजार मतांनी पराभव झाला. पुढे दशरथ पाटील यांनी दोनदा विधानसभा आणि एकदा विधान परिषदेची निवडणूक लढविली परंतु पराभवाने त्यांचा काही पिच्छा सोडला नाही. सन २००७-०९ या काळात महापौरपद भूषविणाऱ्या विनायक पांडे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी केली परंतु निवडणूक रिंगणात लढण्यापूर्वीच त्यांनी माघार घेतली. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले. त्यांनाही आमदारकीने हूल दिली. (प्रतिनिधी)
उपमहापौर फरांदे यांची लॉटरी
महापालिकेत उपमहापौरपद भूषविणाऱ्या तिघांनी विधानसभेत जाण्याचे स्वप्न पाहिले. १९९४-९५ या वर्षी उपमहापौरपद भूषविणारे रामदास सदाफुले यांनी चार वेळा नाशिकरोड-देवळाली मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी केली. परंतु, त्यांना प्रत्येकवेळी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मतदारसंघात त्यांची ओळख ‘सदापडे’ अशीच बनली. २००७-०९ मध्ये भाजपाकडून अजय बोरस्ते यांनी उपमहापौरपद भूषविले, तर भाजपाच्या प्रा. देवयानी फरांदे यांनी २००९-१२ मध्ये उपमहापौरपद भूषविले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उपमहापौरपद भूषविलेले हे दोन्ही उमेदवार मध्य विधानसभा निवडणुकीत आमने-सामने लढले. त्यात अजय बोरस्ते यांच्या वाट्याला पराभव आला, तर प्रा. देवयानी फरांदे यांना अटीतटीच्या लढतीत विधानसभेची लॉटरी लागली.