नाशिक : दुचाकीवरुन सावतानगरकडे जात असताना त्रिमुर्ती चौकात अचानकपणे तोल गेल्याने रमेश श्रीधर सोनवणे (३५) हे रस्त्यावर कोसळले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दुचाकी घटनास्थळावरुन पळविली. दुचाकीची डिक्की उघडून त्यामध्ये ठेवलेली चार लाख आठ हजार ८९० रुपयांची रोकड लंपास करुन दुचाकी सोडून पळ काढल्याची घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली आधिक माहिती अशी, सावतानगर औदुंबर चौक सिडको येथे राहणारे रमेश श्रीधर सोनवणे हे त्यांच्या अॅक्टीव्हा दुचाकीने (एम.एच १५ एफपी ३९९९) बुधवारी रात्री घरी जात होते. त्रिमुर्ती चौकात त्यांचा तोल गेल्याने त्यांना अज्ञात वाहनाचा धक्का लागला व ते जमीनीवर कोसळले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली. यावेळी एका जवळच्या रुग्णालयाजवळ दुचाकी घेऊन जात तेथील बोळीत दुचाकीची डीक्की उघडून त्यामध्ये ठेवलेली चार लाख आठ हजाराची रोकड भामट्याने घेऊन दुचाकी सोडून पोबारा केल्याची घटना घडली. सोनवणे यांनी दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी आढळून आली मात्र डिक्कीत ठेवलेली रोकड लंपास झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक चव्हाण करीत आहेत.
अपघाताचा फायदा घेत दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:21 IST
त्रिमुर्ती चौकात त्यांचा तोल गेल्याने त्यांना अज्ञात वाहनाचा धक्का लागला व ते जमीनीवर कोसळले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली
अपघाताचा फायदा घेत दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाची रोकड लंपास
ठळक मुद्देदुचाकी आढळली मात्र डिक्कीत ठेवलेली रोकड लंपासचार लाख आठ हजार ८९० रुपयांची रोकड लंपास