बँकांना सलग चार दिवस सुट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:42 IST2018-04-28T00:42:03+5:302018-04-28T00:42:37+5:30
गेल्या दोन-तीन आठवड्यांत शहरात निर्माण झालेल्या नोटाटंचाईनंतर आता शनिवारपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या असून, शहरातील विविध बँकाही पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध बँकांमध्ये ग्राहकांची शुक्रवारी (दि. २७) गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन रोख रक्कम काढण्यापासून ते विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

बँकांना सलग चार दिवस सुट्या
नाशिक : गेल्या दोन-तीन आठवड्यांत शहरात निर्माण झालेल्या नोटाटंचाईनंतर आता शनिवारपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या असून, शहरातील विविध बँकाही पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध बँकांमध्ये ग्राहकांची शुक्रवारी (दि. २७) गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्राहकांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन रोख रक्कम काढण्यापासून ते विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिनाअखेरच्या वेळीच बँकांना सुट्या आल्याने ग्राहकांनी वेगवेगळ्या कर्जाचे हप्ते भरणे, उचल व भरण्याचा तपशील घेणे आदी विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. कारण शनिवारपासून चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ एप्रिलला रविवार म्हणून बँका बंद राहणार असून, त्यानंतर ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमेनिमित्त बँकांना सुटी आहे. त्यानंतर १ मे ला महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. या चार दिवसांच्या सलग सुट्यांमुळे विविध बँकांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी शुक्रवारी बँकेत रांगा लावून बँका बंद होईपर्यंत अत्यावश्यक कामे पूर्ण करून घेतली. दरम्यान, बँकांसोबतच विविध शासकीय कार्यालयांनाही चार दिवस सलग सुट्या आल्याने सरकारी नोकरदारांचीही चंगळ आहे. अनेकांनी या सुट्यांचा फायदा घेण्यासाठी पर्यटनाचे बेत आखले असून, या काळात वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुन्हा चलनटंचाईचे संकट
शहरातील चलनटंचाईनंतर परिस्थिती सुधारत असताना बँकांना सलग चार दिवस सुट्या आल्याने पुन्हा एकदा एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवण्याची नागरिकांमध्ये भीती आहे. या चार दिवसांत एटीएममधून सातत्याने पैसे काढले जाणार असताना, बँकांमध्ये होणारा भरणा आणि त्याचा एटीएमला होणारा पुरवठा खंडित होणार आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेकडूनही शहरातील बँकांना अद्याप पुरेशा प्रमाणात नोटांचा पुरवठा होत नसल्याने शहरात पुन्हा चलनटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये दिसून येत आहे.