विदेशी महिलांनी धरला ठेका
By Admin | Updated: September 13, 2015 21:52 IST2015-09-13T21:50:18+5:302015-09-13T21:52:29+5:30
सतुआ बाबा खालसा : ‘गोविंदा-गोविंदा’चा जयघोष

विदेशी महिलांनी धरला ठेका
नाशिक : पांढऱ्या शुभ्र साड्या परिधान केलेल्या विदेशी महिला भाविकांनी स्नान आटोपल्यानंतर कपालेश्वर मंदिरासमोर ठेका धरत दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांच्या मुखातून गोविंदा-गोविंदाचा होणारा जयघोष भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.
सतुआ बाबा शिबिर या खालशातील विदेशी महिला भाविकांचा जथ्था साडेनऊ वाजेच्या सुमारास गंगा गोदावरी मंदिराजवळ पोहचला. यावेळी सर्व विदेशी महिलांनी रामकुंडामध्ये डुबकी मारून दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी साधली. गोविंदा-गोविंदाचा अखंड जयघोष अन् टाळ्यांचा कडकडाट करत हा जथ्था नदीपात्रातून स्नान आटोपून कपालेश्वर मंदिराच्या आवारात आला. यावेळी सर्व विदेशी महिला-पुरुष भाविकांनी गोविंदा-गोविंदाच्या तालावर ठेका धरला. यामुळे काही वेळ भाविकांची या ठिकाणी गर्दी जमली व शाही मिरवणुकीच्या परतीच्या मार्गावर विविध खालसे, आखाड्यांची मिरवणुकीतील वाहने थांबली. गोविंदाचा जयघोष करत ठेका धरणाऱ्या विदेशी भाविकांनी मोठ्या उत्साहात दुसऱ्या शाही स्नानाच्या पर्वणीचा आनंद व्यक्त केला. एकूणच विदेशी महिला, पुरुष भाविकांचा स्नानाचा उत्साह, श्रध्दा अन् भक्ती वाखणण्याजोगी होती. आपला देश जरी दुसरा असला तरी मनाला आणि मेंदूला शांती प्राप्त करून देण्यासाठी ध्यान-भक्तीची साधना करण्याच्या हेतूने जोडले गेलेले हे विदेशी भाविक भारतीय हिंदू संस्कृतीबरोबर पूर्णत: समरस झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. मुखी गोविंदाचा जयघोष करत कुंभमेळ्याच्या दुसऱ्या शाहीस्नानाची पर्वणी विदेशी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने साधली.