परराज्यातील पणत्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:45 IST2020-11-11T22:17:18+5:302020-11-12T00:45:30+5:30
ममदापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्यांना मोठी मागणी असते. दिवाळीच्या तोंडावर परराज्यातील पणत्या बाजारात दाखल झाल्याने स्थानिक कुंभार कारागिरांना मोठा फटका बसला आहे.

परराज्यातील पणत्या बाजारात.
ममदापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणत्यांना मोठी मागणी असते. दिवाळीच्या तोंडावर परराज्यातील पणत्या बाजारात दाखल झाल्याने स्थानिक कुंभार कारागिरांना मोठा फटका बसला आहे.
कुंभार कारागिरांनी वर्षभर राबून दिवाळी सणासाठी मोठ्या संख्येने पणत्यांची निर्मिती केली आहे. मात्र ऐन सणाला पणत्यांची मागणीच घटल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
कुंभार समाज मातीपासून मूर्ती, भांडी, विटा तयार करण्याचे पारंपरिक काम करीत आहे. या पारंपरिक व्यवसायावर कोरोनाने गदा आणली. वाढत्या महागाईने आधीच स्थानिक कारागिरांच्या व्यवसायाला घरघर लागली असताना आता परराज्यातून मातीच्या वस्तू दाखल होत असल्याने स्थानिक कारागीर अडचणीत सापडले आहेत.
स्थानिक कुंभार व्यावसायिक दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पणत्यांप्रमाणे सप्तदीप, पंचदीप, कासवाची जादुई पणती, लक्ष्मीपाद, कंदील अशा विविध प्रकारचे दिवे बनवतात. दोन महिने अगोदरपासून या कामांची लगबग सुरू होते. पणत्या, महालक्ष्मी मूर्ती तसेच लहान मुलांसाठी मातीची खेळणी तयार केली जाते. परंतु या दिवाळीत परराज्यातील पणत्या, चिनीमातीच्या पणत्या, लायटिंग असलेल्या पणत्या बाजारात आल्याने मातीच्या पणत्यांना ग्राहकांकडून मागणी घटली आहे. मातीच्या महालक्ष्मीच्या मूर्तीऐवजी पीओपीच्या मूर्ती ज्या अधिक सुबक दिसतात त्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे.
अनेक पिढ्यांपासून आम्ही हा मातीकलेचा व्यवसाय करत आहे. परंतु बाजारात आता प्लास्टिक, सिमेंट, पीओपी, चिनी मातीच्या पर्यायी वस्तू दाखल होत असल्याने आमचा व्यवसायावर परिणाम झाला आहे. दिवाळीसाठी बनवून ठेवलेल्या वस्तूंचा खपच नाही. अशीच स्थिती राहिली तर कुंभार व्यवसाय हळूहळू नामशेष होईल.
- दादासाहेब शिरसाठ, कुंभार व्यावसायिक, ममदापूर