नुकसानभरपाईसाठी एचएलकडे पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST2020-12-24T04:15:19+5:302020-12-24T04:15:19+5:30
नाशिक: एचएएल येथून उड्डाण केलेले लष्काराचे लढाऊ विमान पिंपळगावजवळील शेतीक्षेत्रात कोसळण्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेत ...

नुकसानभरपाईसाठी एचएलकडे पाठपुरावा
नाशिक: एचएएल येथून उड्डाण केलेले लष्काराचे लढाऊ विमान पिंपळगावजवळील शेतीक्षेत्रात कोसळण्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेत द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत नुकसानभरपाईचा पाठपुरावा एचएएलकडे करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.
सन २०१८ मध्ये पिंपळगावजवळ वावी ठुशी गावातील शिवारात लष्कराचे सुखोई-३० विमान कोसळून शेतपिकांचे तसेच शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. शेतीक्षेत्रात दूरवर विमानाचे अवशेष कोसळले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती बाधित झाली. यामध्ये आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र शेतकरी अपेक्षित मदतीपासून वंचित असल्याने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात खासदाार भारती पवार, आमदार राहुल अहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला चुकीचा अहवाल पाठविण्यात आल्यानेच भरपाई मिळत नसल्याचा आक्षेप घेतला. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात शेतकऱ्यांना किमान १६ केाटी ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला असताना त्याबाबत शासनाकडून हालचाली होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी भरपाईचा विषय लांबणीवर पडत असल्याचा मुद्या उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेनुसार एचएएल हा केंद्राचा विषय असल्याने तसेच केंद्राकडून एचएएलला विमान दुर्घटनेची भरपाई दिल्यामुळे एचएएलनेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा आणि खासदाराांनी हा विषय लोकसभेत मांडावा, अशीदेखील चर्चा झाल्याचे समजते.
--कोट--
शेतकऱ्यांना अधिकची नुकसानभरपाई देण्यासंदर्भात एचएएलने चाचपणी करावी. बाधित शेतकऱ्यांना आणखी मदत करणे शक्य होणार असेल तर त्याबाबत सकारात्मक विचार केला पाहिजे.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.