उड्डाणपुलामुळे नवीन वर्षात होणार वाहतूक सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:25 IST2020-12-31T22:50:06+5:302021-01-01T00:25:39+5:30
नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलामुळे नवीन वर्षात होणार वाहतूक सुकर
नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याच मार्गावर असलेल्या ओझर व पिंपळगाव बसवंत येथील पुलाचेही काम पूर्णत्वाकडे आले असल्याने नवीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुकर होणार आहे .
नाशिक शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विस्तारिकरणात गरवारे पॉंईट ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालय दरम्यान सहा भुयारी मार्ग व प्रकाश पेट्रोल पंपापासून पावणेसहा किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील व समांतर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असली तरी, के. के. वाघ ते हॉटेल जत्रापर्यंत जागोजागी वाहतुकीची कोंडी तसेच अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे विस्तारिकरण करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार करून त्यास केंद्र सरकारने मान्यताही दिली होती. कोट्यवधी रूपये खर्चाच्या या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरूवात करण्यात आली. या विस्तारित उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठीही सोय करण्यात आली आहे. सध्या या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के झाले असून, मुख्य उड्डाणपुलाला तो जोडण्यासाठी पुढच्या महिन्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मार्च अखेरीस ठेकेदारास काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी, कोरोना काळात सहा महिने काम बंद असल्याने आता मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
पाच वर्षे लागली कामाला
या विस्तारित उड्डाणपुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सन २०१६ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर मात्र कामाचा खोळंबा झाला. उड्डाणपुलाचा नकाशा तयार करण्यापासून ते त्यासाठी निधीची तरतूद व प्रत्यक्ष निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरूवात होण्यातच दोन वर्षाचा कालावधी लोटला व सन २०१९ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. २०२१ मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दूर
सन २०२० राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर करणारे वर्ष ठरले. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ओझर व पिंपळगाव बसवंत येथील ग्रामस्थांकडून महामार्गाच्या विस्तारिकरणासाठी असलेला विरोध काही प्रमाणात मावळला. त्यातूनच ओझरला ४ किलोमीटरचा उड्डाणपूल व पिंपळगाव बसवंत येथे ५०० मीटर व कांदा मार्केट येथे ४०० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाली. सध्या ही कामे ८० टक्के पूर्ण झाली असून, नवीन वर्षात त्यावरून वाहतूक सुरू होईल.