सुन्या-सुन्या माॅलिवूडमध्ये चित्रपटशौकिनांची घालमेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:10+5:302021-09-26T04:15:10+5:30
मालेगाव के शोले पासून नावारूपाला आलेले मॉलिवूड जगभरात आपल्या करामतींनी प्रसिद्ध आहे. टाकावू वस्तुंतून चित्रपटांचा सेट उभारतानाच मोबाइल कॅमेऱ्याच्या ...

सुन्या-सुन्या माॅलिवूडमध्ये चित्रपटशौकिनांची घालमेल
मालेगाव के शोले पासून नावारूपाला आलेले मॉलिवूड जगभरात आपल्या करामतींनी प्रसिद्ध आहे. टाकावू वस्तुंतून चित्रपटांचा सेट उभारतानाच मोबाइल कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही चित्रपटांचे शुटिंग पूर्ण करण्याची किमया मालेगावमध्येच होऊ शकते. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून मॉलिवूडला अवकळा प्राप्त झाली आहे. काही प्रकाशाची काजवे अधूनमधून झगमगत असतात, परंतु त्यांनाही मर्यादा येऊन पडल्या आहेत. राज्यात शासनाने कोरोना अनलॉक बाबतीत अनेक व्यवसायांवरील निर्बंध हटवले, पण काही व्यवसायांसह सिनेमागृह सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला नाही. यामुळे चित्रपट व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शासनाने आमचा अंत पाहू नये, असे मत सिनेमागढी व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
मालेगावी सिनेउद्योग महाराष्ट्र भरात प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात सिनेरसिक मालेगावात आहे. शहरात काही वर्षांपूर्वी पंधरा हून अधिक सिनेमागृहे होती. काळाच्या ओघात काही बंद झाली तर आज जेमतेम सात ते आठ सिनेमागृहे तग धरून आहेत. शहरात नवीन सिनेमा प्रदर्शित होण्याचा इतिहास आहे. परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे हा गर्दी करणारा व्यवसाय कोलमडून पडला आहे. या व्यवसाय वर अवलंबून असलेले दोनशेहून अधिक कुटुंब व यावर चाललेले तत्सम व्यवसाय यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पहिली, दुसरी व आता संभाव्य तिसरी लाट यामुळेच सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. व्यवसाय बंद कालावधीत शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे अथवा काही प्रमाणात अटी-शर्तींसह सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे. एक पडदा सिनेमागृह पाडून तेथे व्यावसायिक संकुल बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सिनेमागृह चालक करत आहेत.
कोट....
शहरातील सिनेमागृह हा आर्थिक कणा आहे. असंख्य कुटुंब यावर अवलंबून आहे. कोरोना निर्बंधाबाबतीत नियमानुसार जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत, तर मग चित्रपटाच्या व्यवसायाबाबतीत दुजाभाव का होत आहे? यावर अवलंबून असलेले कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सिनेमागृह चालक किती दिवस त्यांना आर्थिक दृष्टीने सांभाळून घेणार. याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा.
- नरेंद्र सोनवणे, संचालक, संदेश सिनेमागृह, मालेगाव