Flag procession at Saptashringagada | सप्तशृंगगडावर ध्वज मिरवणूक

सप्तशृंगगडावर ध्वज मिरवणूक

ठळक मुद्देशिखरावर ध्वजारोहण : कोविड नियमांचे पालन करत परंपरा ठेवली अखंड

वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड नियम, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना, प्रशासनाची भूमिका याचा समन्वय साधत कीर्तिध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. न्यासाच्या कार्यालयापासून सप्तशृंगदेवीच्या पहिल्या पायरीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. शांततेत मोजकेच लोक सहभागी झाले होते. कोणत्याही वाद्यवृंदाचा समावेश करण्यात आला नव्हता. त्याठिकाणी तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक भगवान नेरकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, राजेश गवळी, गिरीश गवळी, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, भिकन वाबळे व कीर्तिध्वजाचे मानकरी गवळी कुटुंबीयाचे सदस्य उपस्थित होते. गडावर यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रोच्चारात हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर उशिरापर्यंत विधी सुरू होता. या कार्यक्रमास पुरोहित वर्गाव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. या दरम्यान सायंकाळी आरतीनंतर गवळी कुटुंबीय मानकरी कीर्तिध्वज व पूजेचे साहित्य घेऊन शिखरावर मार्गक्रमण करण्यास प्रारंभ करण्यात आला. गडावर रात्री उशिरा कीर्तिध्वज रोहणानंतर ध्वजाच्या दर्शनानंतर नवरात्र उत्सवाची सांगता होते, असे प्रतिवर्षीचे नियोजन परंपरेनुसार यंदाही पार पडले.
दरम्यान, यावेळी यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द झाल्यामुळे गडावर प्रवेशबंदी असल्याने प्रशासनाने कोजागरी पौर्णिमा व तस्सम कार्यक्रम रद्द केले आहेत. दहा फूट लांबीची काठी ११ मीटरचा केशरी रंगाचा ध्वज, गहू, तांदूळ, खोबऱ्याच्या वाट्या, पूजेचे साहित्य असे सर्व घेऊन दरेगावचे कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी हे शिखरावर घेऊन ध्वजारोहणाची परंपरा पार पाडणार असल्याची माहिती सोमनाथ गवळी यांनी दिली. पूजा साहित्य तयारीसाठी कृष्णा गवळी व गवळी कुटुंबीयांनी सहकार्य केले.
 

Web Title: Flag procession at Saptashringagada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.