चार दिवसांत पाच बळी
By Admin | Updated: May 14, 2014 01:00 IST2014-05-14T00:51:53+5:302014-05-14T01:00:54+5:30
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गासह घोटी शहराला जोडणार्या घोटी - सिन्नर व घोटी - वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे.

चार दिवसांत पाच बळी
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गासह घोटी शहराला जोडणार्या घोटी - सिन्नर व घोटी - वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून दुचाकी व इतर वाहनाच्या अपघाताची मालिका कायम असून, गेली चार दिवसांपासून घोटी परिसरात झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई - आग्रा महामार्गावर गोंदे शिवारात लेहेर कारखान्याजवळ झालेल्या अपघातात आडवण येथील एका लष्करी जवानाचा मृत्यू झाला. यानंतर दुसर्या दिवशी घोटी वैतरणा रस्त्यावर वाकी शिवारात साहेबसिंग परदेशी या इसमाचा दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. यानंतर दुसर्या दिवशी घोटी - सिन्नर रस्त्यावर धामणीजवळ एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात चालकासह दहा जण गंभीर जखमी झाले. तर दुसर्या दिवशी घोटीजवळ किनारा हॉटेलसमोर दुचाकीला बसने धडक दिल्याने तळेगाव येथील नानासाहेब रायकर हे जागीच ठार झाले, तर इतर दोघे जण जखमी झाले. या अपघाताला काही तास उलटताच तोच काल रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याने घोटीतील महेश ऊर्फ भावड्या जुंदरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. दरम्यान, महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असताना रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणार्या कंपनीकडून अपघात रोखण्यास उपाययोजना करण्यात सपशेल अपयश येत आहे. महामार्गाबरोबर कसारा घाटातही अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील तुटलेल्या संरक्षक भिंती, नष्ट झालेले गतिरोधक, वळण रस्त्यावरील वाढलेली झाडे, प्रचंड उतार, गायब झालेले दिशादर्शक फलक कारणीभूत ठरत असताना या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे.