नाशिकरोड कारागृहातील फरारी माधोसिंगला अटक
By Admin | Updated: August 17, 2015 01:19 IST2015-08-17T00:45:21+5:302015-08-17T01:19:19+5:30
औरंगाबाद पोलिसांची कारवाई

नाशिकरोड कारागृहातील फरारी माधोसिंगला अटक
नाशिकरोड : मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कारागृहाच्या उंच भिंतीवरून सिनेस्टाइल पलायन करणाऱ्या माधोसिंग यास औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे़ सोळा महिन्यांपूर्वी फरार झालेला माधोसिंग साधूच्या वेशात भटकंती करीत होता़ दरम्यान, त्याची रवानगी पुन्हा नाशिकरोड कारागृहात झाली आहे़
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली माधोसिंग ऊर्फ मंगलसिंग भोसले (३३, रा़ जामगाव, जि़ औरंगाबाद) हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता़ ६ एप्रिल २०१४ रोजी माधोसिंगने बादलीच्या कडीला चादरी व टॉवेल बांधून ती कारागृहाच्या भिंतीवर फेकली व त्याद्वारे सिनेस्टाइल पळून गेला. त्याचा सर्वत्र शोधही घेतला मात्र तो सापडला नाही़
दरम्यान, औरंगाबादचे सहायक पोलीस निरीक्षक बी़ बी़ सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांना फरारी माधोसिंग हा त्याच्या कावळ्याची वाडी येथील घरी आल्याची गुप्त माहिती मिळाली़ त्यानुसार त्यांनी या परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)